चांदणी चौकात झालेला अपघात हा महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी आहे, असा आरोप करत सर्वसाधारण सभेत गुरुवारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत त्यातील रस्तारुंदीचे काम लगेच सुरू केले जाईल. मात्र, अन्य कामे पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे लागतील, असे निवेदन आयुक्तांनी सभेत केले.
सर्वसाधारण सभा सुरू होताच चांदणी चौकातील अपघाताचा मुद्दा पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, प्रशांत बधे, संजय बालगुडे, पुष्पा कनोजिया, प्रा. मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत सात जणांचा अपघाती मृत्यू झाला असून आता तरी अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का, असा नगरसेवकांचा प्रश्न होता.
या विषयावर निवेदन करताना आयुक्त महेश पाठक म्हणाले की, या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल. तसेच या चौकात येणारे तिन्ही रस्ते रुंद करणे, मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चांदणी चौकात न येता परस्पर मुंबईकडे जाता येईल, यासाठी नवा रस्ता करणे आणि सध्याचा जो पूल आहे त्यालाच समांतर आणखी एक पूल बांधणे असे नियोजन आहे. नवे रस्ते व पूल या दोन्ही कामांसाठी सर्वेक्षण आणि खर्चाचा अंदाज तयार करण्याचे काम सुरू आहे.
या भागातील भौगोलिक परिस्थितीमुळे काम करण्यात अनेक अडचणी येतात. पावसाच्या पाण्यामुळे डांबरीकरण वाहून जाते. तसेच कामांसाठी वाहतूक बंद करता येत नाही. त्यामुळे कामे वेगाने होत नाहीत. ही कामे रात्री करावी लागत असल्यामुळे काही मर्यादा येतात. त्यामुळे विलंब होत आहे हे खरे आहे. परंतु तेथील सर्व रस्त्यांचे रुंदीकरण पंधरा दिवसात पूर्ण केले जाईल. रस्त्यांच्या कामासाठी एक आणि व पुलाच्या कामासाठी दोन वर्षे लागतील, अशीही माहिती आयुक्तांनी या वेळी दिली.
                                      
महापालिकेवर शिवसेनेचा मोर्चा
महापालिका अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मोकाटे, तसेच शरद ढमाले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी शिवसैनिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. आयुक्तांच्या कार्यालयात आमदारांसह शिवसैनिक बसून राहिले होते आणि त्यांनी चांदणी चौकातील कामांना विलंब करत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी केली.