कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाल्यामुळे पुढील आठवडय़ापासून उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक ते आठवले चौक दरम्यानच्या प्रस्तावित चक्राकार वाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी होणार आहे. वाहतूक पोलिसांकडून त्याला संमती मिळाल्यानंतर चक्राकार वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत पीएमपी, खासगी वाहनांसाठी उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावर मेट्रोची स्वतंत्र मार्गिका असा दुहेरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामुळे उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढील आठवडय़ात उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन चक्राकार वाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. अभिनव चौकापासून एसएनडीटी महाविद्यालय ते आठवले चौक या दरम्यान चक्राकार वाहतूक प्रस्तावित आहे. त्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरतील, याची पाहणी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते करणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून मान्यता मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

वाहतूक पोलिसांबरोबर महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार आहेत. प्रस्तावित चक्राकार वाहतूक कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असेल. कर्वे रस्त्यावरील वाहने एसएनडीटी महाविद्यालया समोरून विधी महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात येतील आणि तेथे वळसा घालून ही वाहने पुन्हा कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकात येतील. एसएनडीटी महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. डेक्कनकडून कर्वे रस्त्याने तसेच पुढे पौड रस्त्यावर जाणारी वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे.

दुमजली उड्डाणपुलासाठी अठरा खांब उभारण्यात येणार आहेत. त्यातील १३ खांबांवर दुमजली उड्डाणपूल असेल. पाच खांबांवर पुलाच्या उताराचा भार असेल, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.