News Flash

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतून ५६ कंपन्यांचा काढता पाय..

राज्यातील सर्वाधिक मोठा आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे.

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतून ५६ कंपन्यांचा काढता पाय..

|| अविनाश कवठेकर

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि पन्नास लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केले आहे. कंपन्यांचे स्थलांतर असेच सुरू राहिले, तर आयटी पार्कची अवस्था रोजगाराच्या दृष्टीने बिकट होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील सर्वाधिक मोठा आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांबरोबरच राज्यातील आणि राज्या बाहेरील अनेक कंपन्यांनी येथे उद्योग-व्यवसाय सुरू केला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हिंजवडी आयटी पार्क हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा येथील कंपन्यांपुढील कळीचा मुद्दा ठरला आहे.  गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या अनुक्रमे बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित झाल्या होत्या. हा अनुभव ताजा असतानाच आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कला रामराम ठोकला आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतरित झाल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केले आहे.

हिंजवडी.. नको रे बाबा : वाहतुकीच्या अनास्थेमुळे या कंपन्यांना उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही गमवावे लागत आहे. तसे अभिप्राय कंपन्यांकडूनही सातत्याने देण्यात आले आहेत. हा मुद्दा शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्यामुळे हिंजवडी आयटी पार्क नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे.

पायाभूत सुविधांच्या अभावी कंपन्यांचे हिंजवडी पार्कमधून स्थलांतर होत आहे. आयडीएम वर्क्‍स, अ‍ॅग्मायट इंटेलिजेन्ट, क्रिपन अशा माझ्या माहितीतील कंपन्यांचे बाणेर, बालेवाडी आणि अन्यत्र स्थलांतर झाले आहे.   – सुधीर देशमुख, समन्वयक, फ्री अप हिंजवडी मोहीम

वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास विलंब होत आहे.  छोटय़ा कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. कंपन्यांचे  नुकसान होत असल्यामुळे कंपन्यांचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आहे.   – रवींद्र सिन्हा, समन्वयक, हिंजवडी इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड रेसिडेन्ट वेलफेअर असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 1:24 am

Web Title: traffic jam in pune 3
Next Stories
1 दाभोलकरांची हत्या झालेल्या पुलावर सचिन अंदुरेला घेऊन जात सीबीआयची पाहणी
2 वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका
3 केरळमधून थांबलेली अननसाची आवक पुन्हा सुरू
Just Now!
X