संबंधित विभागांची एकत्र बैठक; शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या सूचना

खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कमधील वाहतूक कोंडीची सोमवारी पाहणी केली. हिंजवडी परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पीएमआरडीए आणि एमआयडीसीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन रस्त्यांच्या जागा ताब्यात घ्याव्यात, प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवावेत, अशा सूचना खासदार सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार सुळे यांनी हिंजवडी भागातील रस्त्यांची पाहणी सोमवारी सकाळी केली. त्यांतर हिंजवडी ग्रामपंचात कार्यालयात पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामस्थ आणि हिंजवडी असोसिएशन यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीला सरपंच दीपाली साखरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, पिंपरी पालिकेतील नगरसेवक मयूर कलाटे तसेच अधिकारी उपस्थित होते. हिंजवडी टप्पा १ येथील माण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची सूचना सुळे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेट्टी यांना केली. म्हाळुंगे ते हिंजवडी नवीन पुलासाठीची जागा पीएमआरडीएने ताब्यात घ्यावी, त्यासाठी सर्वच संस्थांनी एकत्रित बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा. हिंजवडीतील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हिंजवडी ते वाकड दरम्यान वाकड येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूल उभा करावा, असे सुळे यांनी सांगितले. या पुलाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासनही सुळे यांनी स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. एमआयडीसीने रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यामुळे रस्ता मोकळा झाला आहे. यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना सुळे यांनी संबंधिताना दिल्या.

चौकीसाठी एक गुंठा देण्यास ग्रामस्थ तयार

हिंजवडी ग्रामपंचायतीने आतापर्यंत ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ज्या-ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हवे आहेत, त्या ठिकाणी पोलिसांची बैठक घेऊन त्यांच्या सूचनांनुसार ते बसवावेत. टप्पा तीनमध्ये एमआयडीसी पोलीस चौकीसाठी एक गुंठा जागा देण्यास तयार आहे. मात्र,पोलिसांनी दोन गुंठे जागेची मागणी केली आहे. पोलिसांच्या मागणीनुसार एमआयडीसी चौकीसाठी दोन गुंठे जागा देण्यास तयार झाली आहे.