लोणावळा-खंडाळा परिसरात शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गाडय़ांवरील नियंत्रण सुटल्याने पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथील उतार व वळणावर ब्रेक निकामी झाल्याने अंडय़ांची वाहतूक करणारा ट्रक उलटला, तर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला उड्डाण पुलाच्या कठडय़ाला कोंबडय़ा वाहून नेणारा टेम्पो धडकला. या प्रकाराबरोबरच रविवारच्या सुटीमुळे वाहने वाढल्याने घाट क्षेत्रामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री खंडाळा परिसरात पाऊस सुरु असताना मुंबईच्या दिशेने भरधाव जाण्याऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो रस्त्याच्या मध्येच उलटला. दुसऱ्या अपघातात पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील उतारावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो पुलाच्या कठडय़ाला धडकला. सुदैवाने टेम्पो पुलावरुन खाली दरीत गेला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
रविवारच्या सुटीमुळे सकाळपासून द्रुतगती मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने खंडाळा घाटातील अमृतांजन पूल व अंडा पॉईंट परिसरात पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर दुपारपर्यत वाहतूक कोंडी झाली होती.
तर, सायंकाळनंतर पर्यटक परतीच्या मार्गावर निघाल्याने पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी झाली.