पिंपरी-चिंचवड शहरात करोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणासह पोलिसांवरील ताण वाढला आहे. याच तणावातून काही घटना घडत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात वाहतूक पोलिसाने मुख्यालय पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याखाली सूरज जालिंदर पोवारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या ५२ वर्षीय पोलीस हवालदार किसन गराडे यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सध्या कोव्हिडमुळे आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यांच्यावरील ताण खूप वाढला आहे. कोव्हिड आल्यापासून पोलीस बांधव दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, किरकोळ कारणावरून त्यांची चिडचिड होत असल्याचं एका घटनेवरून अधोरेखित झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडच्या अनुषंगाने दापोडी हॅरिश पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. तेव्हा, आरोपी हे त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर नव्हते. फिर्यादी पोलीस कर्मचारी किसन गराडे यांनी त्यांना फोन करून हजर राहण्याबाबत विचारणा केली. तेव्हा ‘तू माझा बाप आहेस का? तू मला कोण सांगणारा?’, असं उद्धट उत्तर आरोपी सूरज पोवारने दिलं. आरोपी सूरज याला नाकाबंदी असलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले. तेव्हा तो हातात लोखंडी गज घेऊन आला आणि फिर्यादी यांच्या पायावर मारून खाली पडून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.