पुणे वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी सुरु केली असून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हेल्मेट न घातल्याबद्दल रिक्षाचालकांकडूनही दंड वसूल करण्याची किमया पुणे वाहतूक पोलिसांनी करून दाखवली आहे. इतकंच नाही तर रिक्षात तीन प्रवासी बसले म्हणून थेट रिक्षाचालकाला दंड ठोठावण्यात आल्याचाही अजब प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे दत्तू पाटील मागील 28 वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यांना ट्रिपल सीट आणि वाहतूक परवाना नाही सांगत 700 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत दत्तू पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की, मी गेल्या 28 वर्षांपासून पुणे शहरात रिक्षा चालवत आहे. रिक्षा चालवण्याच्या पाहिल्या दिवसापासून माझ्याकडे वाहतूक परवाना आहे. तरी देखील 17 ऑक्टोबर रोजी मला ऑनलाइनच्या माध्यमातून पोलिसांनी ट्रिपल सीट आणि वाहतूक परवाना नाही म्हणून दंड ठोठावला आहे’.

‘माझ्याकडे वाहतूक परवाना तर आहे. अजब म्हणजे रिक्षा चालकास तीन प्रवासी बसवण्याची परवानगी असताना मला तीन प्रवासी बसवले सांगत दंड लावला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा कारभार कशा प्रकारे चालतो हे दिसून येत आहे. माझा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसताना पोलिसानी दंड ठोठावला आहे. पण अजून मी दंड भरला नसून याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहे’, असं दत्तू पाटील यांनी सांगितलं आहे.

‘जर अशाच चुकीच्या पद्धतीने रिक्षा चालकांवर कारवाई होत राहिल्यास आम्ही कसं जगायचं’, असा सवाल दत्तू पाटील यांनी विचारला आहे. ‘राज्यात ज्याप्रकारे शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत आहे त्याप्रमाणे आम्ही देखील आत्महत्या करायची का अशी विचारणा त्यांनी केली आहे.