शहरातील चौकाचौकात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या आणि सुरक्षित वाहतुकीसाठी दिवसभर राबणाऱ्या वाहतूक पोलिसांच्याच मागण्यांकडे वाहूतक पोलीस शाखेकडून दुर्लक्ष केले जात आहे.. एका जागरूक ज्येष्ठ नागरिकाने पुण्यातील जवळजवळ दोनशे वाहतूक पोलिसांशी प्रत्यक्ष भेटून केलेल्या सर्वेक्षणात हे वास्तव उघड झाले आहे.
ग्राहक पंचायतीचे माजी उपाध्यक्ष विलास लेले यांनी हे सर्वेक्षण केले. ते पोलिसांच्या सुरक्षा पंधरावडय़ानिमित्त चौकाचौकात जाऊन वाहतूक पोलिसांशी बोलले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. लेले यांनी पोलिसांच्या संस्कार भवन येथे वाहतूक पोलिसांना कामाच्या वेळी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शनही केले. लेले यांनी प्रत्यक्ष चौकात जाऊनही पोलिसांना या विषयावर माहिती दिली. त्या वेळी पोलिसांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. वाहतूक पोलिसांनी रोजच्या अडचणींची गाऱ्हाणीच त्यांच्या पुढे मांडली.
याबाबत लेले यांनी सांगितले, ‘‘वाहतूक पोलिसांच्या प्रमुख समस्यांमध्ये वेळेवर रजा मिळत नाही, बसायला-जेवण्यासाठी जागा नाहीत, शौचालये नाहीत, काम करतेवेळी पूर्ण साधनसामग्री दिली जात नाहीत आदी. अडचणी मांडल्या आहेत. तसेच वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ‘वॉर्डन’ना चार महिन्यांचा पगारच दिला गेला नाही, त्यात कपडे मळलेले असले, तर साहेब लगेच रागावतात, अशी माहितीही काही वॉर्डननी दिली आहे.’’
‘‘पोलिसांच्या सर्व अडचणींची माहिती असूनही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही, असे पोलीस सांगतात. त्यामुळे मी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पांढरे यांना भेटून पोलिसांच्या अडचणींची माहिती देणार आहे,’’ असेही लेले यांनी सांगितले.