दररोज चार तास, १३ किलोमीटरची फेरी; आरोग्याची काळजी व पर्यावरण रक्षणाचा संदेश

आरोग्याची काळजी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या हेतूने वाहतूक पोलिसांच्या एका टीमने सांगवी परिसरात सायकलवरून गस्त घालण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी दोन तास मिळून दररोज १३ किलोमीटरची ही फेरी घालण्यात येत आहे. याद्वारे वाहतुकीचे नियोजन करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.

सांगवी परिसरातील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांच्या पुढाकाराने एक जानेवारीपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, सांगवी, काळेवाडी आदी परिसरात सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी सहा ते आठ अशा चार तासात दररोज १३ किलोमीटरची ही गस्त घालण्यात येते. चुकीच्या दिशेने जाणारे वाहनस्वार, चुकीच्या ठिकाणी लावलेली वाहने, पदपथांवर असणारी वाहने आदींवर या दरम्यान कारवाई करण्यात येते. बसस्थानकांवर उभ्या असणाऱ्या रिक्षांवरही कारवाई करण्यात आली असून १७ दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ३५ दुचाकींसह अनेक चारचाकी वाहनचालकांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. या संदर्भात अधिक जनजागृती व्हावी, यासाठी लवकरच सायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे म्हसवडे यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणाचा संदेश तसेच पोलिसांच्या आरोग्याची काळजी, अशा दुहेरी हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमासाठी येथील सामाजिक संस्था व नागरिकांनी मिळून ३० सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत व आणखी २२ सायकली देणार आहेत. वाहतूक पोलीस गस्तीसाठी सायकल वापरतात म्हणून काही नागरिकांनीही सायकलचा वापर सुरू केल्याचे ते म्हणाले. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे आणि एक महिला कर्मचारी गरोदर आहे. तरीही ते सायकलवरून गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.