मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन लाख नवी वाहने रस्त्यावर आल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. दहा महिन्यात १ लाख ४० हजार दुचाकी, तर सुमारे ३८ हजार मोटारी रस्त्यावर आल्या आहेत.
पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची सध्याची आकडेवारी २८ लाख ६२३ आहे. २००१ मध्ये हीच संख्या नऊ लाखांवर होती. त्यामुळे पंधरा वर्षांमध्ये शहरातील वाहनांची संख्या तिपटीने वाढली असल्याचे दिसून येते. शहरात सर्वाधिक संख्या दुचाकी वाहनांची आहे. २००१ मध्ये शहरात सहा लाख ६५ हजार दुचाकी वाहने होती. आज ही संख्या १६ लाखांच्याही वर गेलेली आहे. २००१ मधील मोटारींची संख्या पाहिल्यास ती सुमारे एक लाख दोन हजारांच्या आसपास होती. आज ही संख्या पाच लाखांच्याही पुढे गेली आहे. म्हणजेच मोटारींच्या संख्येमध्ये पंधरा वर्षांत पाच पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. मागील केवळ दहा महिन्यांची आकडेवारी विचारात घेतल्यास मार्च २०१४ मध्ये शहरात सुमारे सुमारे २० लाख दुचाकी होत्या. दहा महिन्यात तक्यात एक लाख ४० हजार दुचाकींची भर पडली.  
शहरातील रस्ते वाढत नसताना वाहनांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच प्रत्येक महिन्याला वाहनांच्या गर्दीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भर पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच प्रमाणात वाहने वाढत राहिली, तर प्रदूषण व पार्किंगसह वाहतूक कोडींसारखे प्रश्न आणखी गंभीर होत जाणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
‘आरटीओ’च्या उत्पन्नामध्ये वाढ
मागील वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा ‘आरटीओ’च्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ५०२ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा जानेवारीपर्यंत ५५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. िपपरी- चिंचवड कार्यालयाच्या वसुलीत सुमारे २३ कोटी, बारामती कार्यालयाच्या वसुलीत दोन कोटी, अकलूज सुमारे दोन कोटी, तर सोलापूर कार्यालयाच्या वसुलीत पाच कोटींची वाढ झाली आहे. संपूर्ण पुणे विभागाच्या वसुलीने हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून, जानेवारीपर्यंत १०४१ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.