रेल्वेचे पूर्वीचे पास करोना कालावधीत नापास; शेकडो पासधारकांचे पैसे रेल्वेकडे अडकून

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीनंतर पुणे-मुंबई दरम्यान डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असली, तरी या प्रवासासाठी पूर्वी काढलेले पास ग्रा धरण्यात येत नाहीत. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या शेकडो पासधारकांचे पैसे रेल्वेकडे अडकून पडले आहेत. अशा स्थितीत दररोजच्या प्रवासासाठी त्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. नव्याने पासही दिले जात नसल्याने रोजच्या आरक्षणाची डोकेदुखीही वाढली आहे.

करोनाच्या टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर सध्या पुणे-मुंबई दरम्यान एकच गाडी सुरू करण्यात आली आहे. पुणे-मुंबई दरम्यान नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या नऊ ते दहा हजारांच्या आसपास आहे. दररोजचा प्रवास असल्याने टाळेबंदीपूर्वी अनेकांनी तीन ते सहा महिने किंवा काहींनी वर्षभराचे पास काढून ठेवले आहेत. हे पास सध्याच्या गाडीसाठी ग्रा धरले जात नाहीत. मुंबईमधील उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर पासधारकांना मुदतवाढ देण्यात आली. बंदच्या कालावधीतील पासचा कालावधी पुढे वाढवून देण्यात आला असून, पूर्वीच्या पासवर शिक्के मारून प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तशी व्यवस्था पुण्यात का नाही, असा प्रश्न रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी उपस्थित केला आहे.

पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी मात्र पूर्वीच्या पासबाबत कोणताही निर्णय रेल्वेने घेतलेला नाही. संबंधित गाडी ‘विशेष’ या श्रेणीतील असल्याने पास ग्रा नसल्याचे तांत्रिक कारण रेल्वेकडून देण्यात येत आहे. त्याबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सहा महिने किंवा वर्षभराच्या प्रवासाचे पैसे रेल्वेकडे अडकून पडले असताना नव्याने दररोजच्या आरक्षणासाठी पैशांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी वेळही खर्ची घालावा लागत असल्याचे वास्तव प्रवाशांकडून मांडण्यात येत आहे.

पुणे-मुंबई प्रवासासाठी पूर्वीचे पास ग्रा धरले जात नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. सध्या पर्याय नसल्याने हा भुर्दंड प्रवासी सहन करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने तातडीने पासबाबत निर्णय घेऊन या प्रवाशांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे प्रवाशांची संख्या लक्षात घेता गाडय़ांची संख्याही वाढवावी.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा