ठाकूरवाडीजवळ ओवरहेड वायर तुटल्याने मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी रेल्वेंना ब्रेक लागला आहे. मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली आहे. या बिघाडामुळे मात्र मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, कर्जतच्या अलीकडे अनेक रेल्वे गाड्या थांबवण्या आल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ठाकूरवाडी कॅबिनजवळ ओवरहेड वायर तुटली. यामुळे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेंवर याचा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि सह्याद्री या रेल्वे गाड्या एका रांगेत उभा असल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वेसेवा दोन तासांपासून ठप्प असून ओवरहेड वायर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी कर्जतला उतरून खोपोलीमार्गे लोणावळा येथे येत आहेत. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईला नियमीत येणाऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली आहे.