विमानप्रवास करण्याची भीती, विमानाला उशीर झाल्यामुळे वेळेवर पोहोचण्याचे दडपण, अनेक तास थांबून होणारी चिडचिड या गोष्टींवर उपाय म्हणून मुंबई विमानतळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला असून यात प्रवाशांचा ताण घालवण्यासाठी त्यांना चक्क कुत्र्यांशी खेळण्याची संधी देण्यात येत आहे. पुण्यातील ‘अॅनिमल एन्जल्स फाउंडेशन’चे तीन प्रशिक्षित कुत्रे या प्रकल्पासाठी काम करत आहेत.
२६ सप्टेंबरपासून मुंबई विमानतळावर हा प्रकल्प सुरू झाला असून पहिल्या तीन महिन्यांसाठी तो शुक्रवार ते रविवार या दिवसांत सायंकाळी राबवला जाणार असल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्तया वीणा चिपळूणकर यांनी दिली. देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यात विमानतळावर ‘बोर्डिग गेट’जवळ हे प्रशिक्षित कुत्रे व त्यांचे प्रशिक्षक (हँडलर) थांबतात. ज्या व्यक्तींना विमानात बसण्याची भीती वाटणे, अनेक तास विमानतळावर थांबावे लागल्यामुळे चिडचिड होणे, दु:खद प्रसंगासाठी विमानप्रवास करणाऱ्यांच्या मनावर असलेला ताण, कामासाठी सातत्याने विमानप्रवास करावा लागणाऱ्यांना असलेला ताण, वेळेत पोहोचण्याबद्दलची भीती अशा प्रवाशांच्या विविध समस्यांवर त्यांना कुत्र्यांशी खेळण्याची, त्यांना हात लावण्याची संधी दिली जाते. संस्थेच्या संस्थापक मीनल कविश्वर म्हणाल्या, ‘अशा वेळी कुत्र्यांबरोबर खेळल्यामुळे प्रवाशांना बरे वाटते आणि ताण नाहीसा झाल्यासारखा वाटतो. विशेषत: लहान मुलांना कुत्र्याशी खेळायला आवडते. ज्यांना ताण नसतो, त्यांनाही कुत्र्यांशी खेळून आनंद होतो. प्रत्येक कुत्र्याबरोबर एक ‘डॉग हँडलर’ असतो. ही व्यक्ती समुपदेशक असून कुत्रा आणि माणसे या दोघांबरोबर कसे काम करायचे हे त्यांना शिकवलेले असते.’
सध्या या प्रकल्पात ३ ‘गोल्डन रीट्रिव्हर’ प्रजातीची कुत्री आलटून-पालटून काम करत आहेत. १० वर्षांची ‘गोल्डी’, ४ वर्षांची ‘पेपे’ आणि २ वर्षांची ‘सनशाइन’ अशी त्यांची नावे आहेत. संस्थेचे प्रमुख थेरपी डॉग ट्रेनर आकाश लोणकर यांनी या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे, असेही कविश्वर यांनी सांगितले.