पोलिसांप्रमाणेच खाकी वर्दीत असणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांना (सहायक मोटार निरीक्षक) पोलिसांकडून शिस्त आणि कायद्याचे धडे दिले जात आहेत. पुण्यातील महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या सहायक मोटार निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडण्यात आलेल्या सहायक मोटार निरीक्षकांना मोटार वाहन कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. पोलिसांप्रमाणेच सहायक मोटार निरीक्षकांचा सर्वसामान्य जनतेशी संबंध येत असतो. त्याच बरोबर त्यांना वाहन परवाना, मोटारीची कागदपत्रे पाहणे अशी विविध कामे करावी लागतात. पोलिसांप्रमाणेच सहायक मोटार निरीक्षकांना खाकी वर्दी असते. पण, पोलिसांप्रमाणे त्यांच्या अंगावरील खाकी वर्दीचा रुबाब नसतो. त्यामुळे राज्य परिवहन विभागाकडून नवीन दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्त व कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून दोन महिन्यांचा प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात ५१ सहायक मोटार निरीक्षक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी झाले. या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. जाधव, अजित शिंदे, गुप्तवर्ता प्रबोधिनीचे उपसंचालक अरविंद माने, पोलीस उपअधीक्षक विजय पळसुले, सुखदेव जाधव आदी उपस्थित होते. या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात गुन्हेगारी विषयक कायदे, पुरावा कायदा, मुंबई पोलीस कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, ट्रॅफिक इंजिनीअरिंग, सायबर क्राइम, वाहनकर आणि प्रवासी कायदा, माहितीचा अधिकार यांची माहिती दिली जाणार आहे. त्याच बरोबर परेड, ड्रील याचे पोलिसांप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांची पासिंग आउट परेड घेतली जाणार आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. जाधव यांनी सांगितले, की सहायक मोटार निरीक्षक हे एक लोकसेवक आहेत. त्यांचा जनतेशी संपर्क येत असल्यामुळे त्यांना मोटार वाहन कायद्याबरोबरच, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. गैरवर्तन हे वर्दीला शाप आहे. त्यामुळे शिस्त महत्त्वाची आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आरटीओमध्ये उच्च शिक्षितांच्या संख्येत वाढ
मोटार परिवहन विभागात पूर्वी आयटीआय, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले अधिकारी येत होते. पण अलिकडे अभिंयता, तांत्रिक पदवी, पदविका झालेले अधिकारी येत आहेत. त्याच बरोबर व्यवस्थापन (एमबीए)चे शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढून लागली आहे. आरटीओ विभागाचा लोकांशी सतत संपर्क असतो. उच्च शिक्षित तरुण या विभागाकडे येऊन लागल्यामुळे त्याचा लोकांशी संपर्क साधताना निश्चित फायदा होत आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. जाधव  यांनी दिली.