पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक बदलल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रेंगाळलेल्या उपसंचालक कार्यालयाला झडझडून जागी आली असून मावळत्या उपसंचालकाना भेटण्यासाठी गर्दी उसळली आहे. साहेबांनी पदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी आपले प्रकरण मार्गी लागावे, फाईलवर सही व्हावी यासाठी अडल्या नडलेल्यांनी कार्यालयात गर्दी केली आहे. साहेबांनाही कामाचा उरक असल्यामुळे त्यांनी दीड वर्षांतील अनेक प्रकरणे दोन दिवसांत मार्गी लावल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.

पुणे विभागाच्या उपसंचालकपदी दीड वर्षांनंतर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची बातमी सगळीकडे पसरली आणि उपसंचालक कार्यालयात गर्दी उसळली. कुणी सहज डोकावणारे, कुणी नवे साहेब कसे आहेत याचा अंदाज घेण्यासाठी आलेले, तर कुणी मावळत्या साहेबांचा निरोप घेण्यासाठी आलेले. मावळते साहेब जाण्याआधी शेवटच्या टप्प्यांत आलेली कामे पूर्ण व्हावीत म्हणून आपापल्या फायली घेऊन आलेल्यांच्या गर्दीने उपसंचालक कार्यालयाचा परिसर भरून गेला होता.

मावळत्या साहेबांचाही कामाचा उरक मोठा असल्यामुळे त्यांनीही गेल्या दीड वर्षांत रेंगाळलेली अनेक प्रकरणे अवघ्या दोन दिवसांत मार्गी लावली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक फायलींवर न थकता साहेब सह्य़ा करत असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.