‘पोलीस आयुक्तालयाची इमारत राज्यात सर्वाधिक आकर्षक’

पिंपरी: पिंपरी महापालिकेसह अनेकांचे दातृत्व लाभल्याने पिंपरी पोलीस आयुक्तालयातील ठाण्यांचा कायापालट झाला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयांना लाजवतील, अशा प्रकारच्या पोलीस ठाण्यांच्या वास्तू दिसत आहेत. हे कमी म्हणून की काय, राज्यातील सर्वाधिक आकर्षक शासकीय कार्यालय म्हणून पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या नियोजित इमारतीकडे पाहिले जाईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच व्यक्त केला आहे.

पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झाले. अगदी सुरुवातीला चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमधून कारभार होत होता. त्यानंतर, चिंचवडच्या प्रेमलोक पार्क  येथील शाळाइमारतीचे सुशोभीकरण करून तेथेच आयुक्तालयाची मुख्य प्रशासकीय इमारत थाटण्यात आली. तरीही आयुक्तालयासाठी नव्या जागेचा शोध सुरूच ठेवण्यात आला होता. अखेर, चिखलीतील जागा निश्चित झाली. चिंचवडला नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या कार्यक्रमात, अजित पवार यांनी लवकरच आयुक्तालयाची नवी इमारत उभारण्यात येईल आणि ती इमारत राज्यात सर्वाधिक आकर्षक असेल, असे विधान केले आहे.

शहरातील पोलीस ठाणे अद्ययावत करण्याच्या कामाला यापूर्वीच सुरूवात झालेली आहे. शहरातील अनेक पोलीस ठाण्याच्या इमारती चकचकीत आणि उठावदार करण्याचे काम सुरू आहे. अनेक पोलीस ठाण्यांसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या असून अंतर्गत सजावट, फर्निचरसाठी सढळ हाताने मदतही केली आहे. याशिवाय, विविध दानशूरांनी पोलीस ठाण्यांसाठी भरभरून मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळेच, पूर्वीचे पोलीस ठाण्यांचे रूपडे एकदम बदलले आहे. नव्या स्वरूपातील ठाण्यांच्या इमारती सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

नव्याने करण्यात आलेल्या रंगरंगोटीमुळे पोलीस ठाण्यांच्या इमारती चकचकीत झाल्या आहेत. अंतर्गत स्वच्छतेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करताना तुलनेने अधिक उत्साह जाणवतो.  वातावरण प्रसन्न वाटते. कागदपत्रे ठेवण्याचा कक्ष, साहित्य, मुद्देमाल ठेवण्याची सुसज्ज व्यवस्था आहे.

– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी आयुक्तालय.