पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात रोहित्राचा भीषण स्फोट होऊन झालेल्या विचित्र अपघातात आजी आणि नातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, चार महिन्यांच्या चिमुकलीची आई मृत्यूशी झुंज देत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उशिरा दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शारदा दिलीप कोतवाल (वय ५१) आणि शिवज्ञा सचिन काकडे (वय ४ महिने) असे मृत्यू झालेल्या आजी आणि नातीचे नाव आहे. तर चिमुकलीची आई अक्षदा गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या ऐंशी टक्के भाजल्या आहेत.

भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये बैठी पत्र्यांची घरे आहेत. या घरांजवळच वीजवाहक रोहित्र आहे. दरम्यान, शुक्रवारी या रोहित्रात बिघाड झाल्याने शनिवारी त्याजागी दुसरे रोहित्र बसवण्यात आले होते. परंतु, काही तासात त्याचा भीषण स्फोट झाला आणि या रोहित्राने पेट घेतला. या भीषण स्फोटात आजी आणि नातीला आपला जीव गमवावा लागला.

शारदा कोतवाल या आपल्या नातीला (शिवज्ञ काकडे) दुपारच्या सुमारास अंघोळ घालत होत्या. त्यांच्या शेजारी चुमुकलीची आई अक्षदाही बसल्या होत्या. तेवढ्यात, जवळच काही फुटांवर असलेल्या या रोहित्राचा भीषण स्फोट झाला आणि त्यातील उकळत तेल चिमुकलीसह दोघींच्या अंगावर पडलं. यात आजी आणि नात या गंभीर भाजल्या त्यामुळे त्यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.