राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यातील तृतीयपंथी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी अन्न त्याग करुन कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी झाली पाहिजे तसेच त्यांच्या शेतमालास योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी तृतीयपंथीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी तृतीयपंथी गब्रेल म्हणाल्या, शेतकरी राजा काळया मातीमध्ये एक प्रकारे सोने पिकवतो. त्याच्याकडे या सरकारचे लक्ष नाही. शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून त्याच्या शेतमालास हमी भाव मिळवून देत कर्जातून मुक्तता करायला हवी. या दोन मुद्यांशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने उचलायला हवा, अशी भावना देखील आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठोस भूमिका घेत नसल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो असून एकदिवसीय अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला. या आंदोलनकर्त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी देखील भेट घेतली. दळभद्री सरकारच्या डोळयात अंजन घालण्याच काम तृतीयपंथीयांनी अन्नत्याग आंदोलानामधून दाखवून दिले आहे, असे सांगत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला.

विधीमंडळाच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. शेतकरी कर्जमाफी जाहीर करा, तरच अधिवेशनाचे कामकाज सुरु राहील, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. अर्थसंकल्प मांडतानाही विरोधकांनी गदारोळ केला होता. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभरात संघर्ष यात्रा काढल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता तृतीयपंथीयांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. समाजातील दुर्लक्षित अशा वर्गातून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाकडे सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेच असेल.