24 September 2020

News Flash

नियमावलीच्या परीक्षेत ‘नापास’ बसमधूनच विद्यार्थ्यांची वाहतूक

राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीच्या परीक्षेत यापूर्वीच ‘नापास’ झालेल्या बसमधूनच विविध शाळेतील विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे.

| June 27, 2013 03:00 am

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीच्या परीक्षेत यापूर्वीच ‘नापास’ झालेल्या बसमधूनच विविध शाळेतील विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक सुरू आहे. स्कूल बसबाबत असलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची कोणतीही ठोस यंत्रणा अद्यापही उभी राहिली नसून, प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांकडूनही अशा गाडय़ांना मोकळे रान मिळत आहे.
राज्यात शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांना झालेल्या अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन या वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखले. त्यानुसार नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार ‘शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्कूल बस नियम व विनियम २०१०’ तयार केले आहे. त्यातून स्कूल बससाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. नियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बसबाबतचे कडक नियम करण्यात आले आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती असेल. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन व कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहायकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बस १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम घालण्यात आला आहे.
नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व शहर स्तरावरील मुख्य समितीबरोबरच शालेय स्तरावर प्रत्येकी एक समिती स्थापन करण्याचे नियोजन आहे. या समितीलाच बसचे भाडे व थांबे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत बहुतांश शाळेमध्ये अशा कोणत्याही समित्या नाहीत. नियमावलीनुसार बस आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांकडेही ठोस योजना नाही. आरटीओकडून सुरुवातीला काही गाडय़ांवर कारवाई झाली, पण यंदाचे शालेय वर्ष सुरू होताच या गाडय़ा पुन्हा विद्यार्थी वाहतुकीत आल्या.
 सध्या विद्यार्थी वाहतुकीत असलेल्या बहुतांश वाहनांची स्थिती वाईट आहे. काही मोठय़ा शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था आहे. या शाळांच्या बसबाबत नियमावलीचे पालन केले जाते. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी अनेक शाळांची भूमिका असते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती घेतली जात नाही. अशा स्थितीत अत्यंत जुन्या व कोणतीही विशेष सुविधा, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसलेल्या अनेक बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते आहे. मूळ प्रवासी वाहतुकीतून बाद झालेल्या जुनाट गाडय़ा रंगरंगोटी करून स्कूल बस म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत वापरण्यात येत असून, अशा वाहनांतील दोषांमुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:00 am

Web Title: transport of students in failure code school bus
टॅग Rto,School Bus
Next Stories
1 विकास आराखडय़ाला तब्बल सत्त्याऐंशी हजार हरकती
2 मोलकरणीवर बलात्कार करणाऱ्या संगणक अभियंत्याला अटक
3 भंडारा-भामचंद्र आंदोलन : देहूरोड येथे उद्या (२८ जून) पुणे-मुंबई रस्ता वारकरी अडवणार
Just Now!
X