देशभरातील टोल नाक्यांच्या रांगेत थांबल्याने वाया जाणारा वेळ व इंधन वाचविण्यासाठी ऐंशी लाख वाहतूकदारांकडून एकरकमी टोल भरण्याचा पर्याय केंद्र शासनापुढे ठेवला आहे. मात्र, विविध बैठकांमध्ये या मागणीवर विचार न झाल्याने ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने १ ऑक्टोबरपासून मालवाहतुकीसह प्रवासी वाहनांच्या बंदचा निर्णय जाहीर केला आहे.
संघटनेचे संचालक व टोल समितीचे सदस्य बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले,की देशभरातील टोलनाक्यांवर लागणाऱ्या रांगा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीमुळे वर्षभरात ८८ कोटी रुपयांचे नुकसान इंधनाच्या माध्यमातून होते. टोल नाका ही आमची समस्या नाही. पण, टोल भरण्यासाठी लागणारा वेळ व इंधन ही डोकेदुखी आहे. त्यामुळे आमच्या ८० लाख सभासदांकडून टोलसाठी लागणारी रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा पर्याय दिला आहे. त्यातून शासनाचे कोणतेही नुकसान होणार नाही. याबाबत मागील वर्षांमध्ये वेळोवेळी शासनाबरोबरच झालेल्या बैठकांमध्ये याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने १ ऑकटोबरपासून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे ते दिल्ली या प्रवासात तब्बल १८ टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर सरासरी २० मिनिटांचा वेळ धरल्यास चार ते पाच तास टोल भरण्यासाठीच जातात. बंदच्या या आंदोलनामध्ये दूध, भाजीपाला व औषधांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा समावेश करावा की नाही, याबाबत पुणे व मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.