टोल भरण्यासाठी लागणारा वेळ व इंधन वाचविण्याच्या दृष्टीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी परवाना देताना एकदमच टोलची वसुली करावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केली आहे. याबाबत निर्णय न घेतल्यास १ सप्टेंबरपासून देशभरात ७५ लाख वाहने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेचे व्यवस्थापकीय समितीचे सभासद बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोईमतूर येथे झाली. त्यात याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. टोलच्या प्रश्नावर संघटनेच्या वतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
टोलची रक्कम भरण्यास वाहतूकदारांचा विरोध नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, वेळ व रांगेत थांबण्यासाठी लागणारे इंधन वाचविण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात. प्रत्येक वाहनाच्या राष्ट्रीय परवान्याबरोबरच प्रत्येक वर्षांला टोलची रक्कम एकत्रित घेतली जावी. त्यामुळे टोलच्या वसुलीतील १५ टक्के गळतीही थांबू शकेल. वेळ व इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे टोलची रक्कम अगाऊ मिळू शकेल. प्रत्येक वाहनाच्या वजनानुसार टोलची रक्कमही ठरविता येईल. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी संघटनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.