लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या तरूण पर्यटकांचा धबधब्याच्या खाली भोवऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. श्रीराम साहू (वय-२४) असे मृत पर्यटकांचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. तो मूळचा ओदिशा येथील असून सणसवाडी येथे खासगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी सकाळी तीन मित्रांसह लोणावळ्यात फिरण्यासाठी गेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथे राहत असलेला श्रीराम साहू मित्रांसह मंगळवीरी लोणावळ्यातील पर्यटनस्थळं फिरण्यासाठी गेला होता. भुशी धरणाकडे जात असताना एका हॉटेलमध्ये त्याने मद्यपान केले. जेवण करून ते सर्वजण भुशी धरणाकडे गेले, तिथे सर्वांनी दुपारी दीड तास पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. यानंतर पुन्हा रिक्षा करून घुबड तलावाकडे आले. यावेळी रिक्षातून उतरल्यानंतर मृत साहू हा तलावाच्या जवळील धबधब्याच्या दिशेने धावू लागला. तेव्हा, मित्रांनी त्याला तिकडे जाऊ नकोस असे देखील सांगितले. मात्र मद्यधुंद असलेल्या साहू याने त्यांचे एकले नाही. तो येथील धबधब्या खाली थांबून उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होता. पाण्याचा वेग आणि प्रवाह जास्त असल्याने भोवरा तयार झालेल्या जागी साहू गेल्याने तो बुडाला. मद्यपान जास्त झाल्याने त्याला वर येता आले नाही. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. येथील पर्यटकांना मित्रांनी मदतीसाठी बोलावले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.