मी पुणेकर आहे याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. अर्थात इतर लोक ‘पुणेरी’ असा उल्लेख करतात. कधी पुणेरी चोखंदळपणा, पुणेरी विक्षिप्तपणा अशी बरीच चर्चा पुण्याबद्दल होत असते. इतिहासाचा मागोवा घेतला किंवा अगदी नजीकचा भूतकाळ पाहिला तरी पुण्याची अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक अशी वैशिष्टय़े आहेत. त्या सर्व ठळक वैशिष्टय़पूर्ण आठवणीसुद्धा अनेक ठिकाणी पुण्याचे वेगळेपण लक्षात आणून द्यायला पुरेशा आहेत.
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे पारतंत्र्यात न्यायालयात धाडसाने, कणखरपणे सांगणारे लोकमान्य टिळक हेही पुणेकरच. स्वातंत्र्याचा हा मूलमंत्र भारतीयांना देऊन ते खऱ्या अर्थाने ‘लोकमान्य’ झाले. ज्यांच्या प्रेरणेतून, स्वातंत्र्य हे कोणासाठी हे समजून घ्यायचे असेल तर प्रथम भारतभ्रमण करा, संपूर्ण भारत पाहून या, हा मंत्र घेऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी निघाले. ते डॉ. गोपाळ कृष्ण गोखले हे पुण्याचेच. ते गांधीजींना गुरुस्थानी होते. दलितांकरिता आपल्या विहिरी खुल्या करणारे समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, समाजसुधारक आगरकर, देशामध्ये दलितांकरिता, शोषितांकरिता सर्वप्रथम ‘डिप्रेस क्लास सोसायटी’ स्थापन करणारे महर्षी विठ्ठल रामजी (अण्णासाहेब) शिंदे हे पुण्यातले. सत्यशोधक चळवळीतील तात्यासाहेब जेधे, जवळकर हेही पुण्यातीलच. अशी वर नमूद केल्याप्रमाणे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक स्थित्यंतरे, वैशिष्टय़े या पुण्याने पाहिलेली आहेत.
४०-५० वर्षांपूर्वीच्या माझ्या लहानपणी पाहिलेले पुणे आजही मला चांगले आठवते. त्या आठवणींना उजाळा देत असताना मी अगदी हरवून जातो. माझ्या लहानपणीचे गणेशोत्सव व शिवजयंतीचे उत्सव मला आठवतात. त्या वेळी मी नानापेठेत राहात होतो. तेथे हिंदू, मुस्लिम, हरिजन, ख्रिश्चन, पारसी, इराणी, ज्यू अशा सर्व जातिधर्माचे लोक आमच्याभोवती राहात. त्यामुळे खरा भारत म्हणजे काय याचा मला लहानपणीच अनुभव आला. नानापेठेत शिवराज गणेश मंडळ होते. शिवजयंती, नाताळ साजरे व्हायचे. मुस्लिमांचे ताबूत बसायचे. त्यात मी सहभागी व्हायचो. हे सर्व अनुभवत असताना लहानपणीच वारकरी संप्रदायातील मामासाहेब दांडेकर व अन्य कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी मला मिळाली. उदार मानवतावादाचे हे सुंदर दर्शन माझ्या मनातील कुठल्या तरी आठवणीत मला घेऊन जाते. आमच्या गल्लीमध्ये अक्षरश: सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभागी होत असत. अनेक वेळा आमच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी हे मुस्लिम असत. तेथे मला भेदभाव जाणवला नाही. त्या वेळी मी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना न चुकता या कार्यक्रमात सहभाग घेत होतो. गणपती विसर्जन मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध असायची. मिरवणुकीत मी व माझा भाऊ हलगी वाजवायचो, तर मोठा भाऊ ढोल वाजवायचा. गाणी म्हणण्याचे काम शाहीर शेख इमाम हे करत. त्यांचा आवाजही उत्तम होता. झोपडीवजा असलेल्या त्यांच्या घरी त्यांच्या मुलीच्या बारशाला स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण हे आले होते. हे शाहीर शेख इमाम २६ जानेवारी व १५ ऑगस्टला आम्हा सर्वाना घेऊन झेंडावंदन करायचे व देशभक्तिपर गाणी म्हणायचे. त्यांच्यासमोर माझे मामा स्वातंत्र्यसेनानी कै. रामचंद्र भाऊसाहेब भोसले राहात होते. ते गोवा स्वातंत्र्यलढय़ातील स्वातंत्र्यसैनिक होते. पूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. आज ते हयात नाहीत. आता त्यांच्या पत्नीला स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन मिळते. १९६२ला चीन  आक्रमणाच्या वेळी मी विद्यार्थी होतो. त्या वेळी शाहीर शेख इमाम हे माईकवर गाणी म्हणत होते.
ये नौजवान साथियों है कसौटी आज।
तुम शेर हो, दिलेर हो, रखो वतन की लाज।
हेच शेख आमच्या आळीतील लग्नांमध्ये मंगलाष्टकादेखील म्हणत. या सर्व गोष्टींची मला आजही आठवण होते. हे सगळे पुण्यामध्येच घडू शकते.
ताबूत तयार करणारे बाबूभाई शेख इनामदार हे आमच्या घराच्या जवळच राहात होते. एक-एक महिना आम्ही ते ताबूत तयार करताना पाहात असत. त्यांच्या हौदाभोवती धुला, धुला असे आम्ही नाचत असत. शेख इनामदार यांच्या आई उमानी या विडीकाम करत असत. रामायण- महाभारतातील शेकडो गाणी त्यांना तोंडपाठ होती. त्यांना धार्मिक लोकगीतेही पाठ होती. माझी आईही हौशी होती. नागपंचमीला अनेक बायकांना बोलावून फेर धरून गाणी म्हणायची. या बायकांमध्ये उमानी बसत व उत्तम आवाजात त्या लोकगीते म्हणायच्या. हे सर्व मी बाजूला बसून पाहिलेले आहे. वारकरी संप्रदायातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व म्हणजे मामासाहेब बडदे. ते १९५६ साली डेप्युटी मेयर होते. त्यांनी ६८ वेळा पायी वारी केली. ते या बायकांचा फेर चालू असताना गवळणी म्हणण्याकरिता तेथे येत असत. हे मी या पुण्यामध्येच पाहिलेले आहे.
आमच्या घराच्या दोन चौक पलीकडे गेले, की कॅन्टोन्मेंटची हद्द सुरू होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या दस्तूर मेहेर गणेशोत्सव मंडळाचे एक वेगळे वैशिष्टय़ आहे. त्यांची पूजेची मूर्ती व विर्सजनाची मूर्ती वेगवेगळी आहे. पूजेची मूर्ती वर्षभर ठेवण्याची त्यांची परंपरा आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर जवळच असलेल्या एका पारशी कुटुंबाच्या घरात ही मूर्ती ठेवली जाते व विधिवत मूर्तीची पूजा केली जाते. काही कार्यकर्त्यांनी एक मंदिर बांधून तेथे मूर्ती ठेवण्याबाबत सुचविले. तेव्हा या पारशी कुटुंबाने पूजेची मूर्ती आमच्याच घरात राहू द्या असे सांगितले. कार्यकर्त्यांनी हट्ट धरल्यावर तर ते रागाने त्यांच्याशी भांडायला लागले व म्हणाले, की आमच्या घरातून मूर्ती हलवू देणार नाही. यातून त्या पारशी कुटुंबाची उदात्त भावना दिसून येते. आजही ही मूर्ती त्या पारशी कुटुंबाच्या घरातच ठेवली जाते व चतुर्थीला मूर्तीची पूजा केली जाते. त्यात कधीही खंड पडलेला नाही. हे मला पुण्याचे एक वेगळे वैशिष्टय़ वाटते.
माझ्या वडिलांचा महात्मा फुले मंडईत कांदे-बटाटय़ाचा गाळा होता. आजही तो आहे. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी महात्मा फुले मंडईत कांदे-बटाटय़ाचा व्यापार केला. सुरुवातीच्या काळातही त्यांनी अपार कष्ट केले. आता ती मंडई उरलेली नाही. मंडईमध्ये खूप गर्दी असायची. माझ्या आजही लक्षात आहे, की अनेक कुटुंबे नित्यनेमाने अगदी एखाद्या मंदिरात जावे तशी आमच्या गाळय़ावर यायची. आमच्या वडिलांचे व त्यांचे जिव्हाळय़ाचे नाते निर्माण झालेले होते. एकमेकांच्या सुख-दु:खात, लग्नसमारंभात ते सहभागी व्हायचे.
पुण्याच्या मंडईचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कै. काकासाहेब गाडगीळ यांनी मंडईचा उल्लेख ‘मंडई विद्यापीठ’ असा केलेला आहे व तो फार अर्थपूर्ण आहे. गणेशोत्सव, तांबोळय़ांचा ताबूत हे सर्व मंडईकर मिळून करत असत. आमच्या गाळय़ाच्या बरोबर समोर गुलाबभाई आत्तार यांचा लसणाचा गाळा होता. ते कट्टर वारकरी होते. त्यांनी हज यात्राही केली होती. मंडईच्या हरिहर भजन मंडळाचे ते विणेकरी होते. विणेकरी होण्याचा मान त्यांना मिळाला होता. शेकडो अभंग, गवळणी, ओव्या त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांचा आवाजही उत्तम होता. त्याचबरोबर ते संत कबीराचे दोहेही म्हणायचे. अखंडपणे त्यांनी न चुकता पंढरीची वारी केली. नित्यनेमाने ते नमाजही पढायचे. वारीमध्ये कोणत्या वेळेला कोणता अभंग म्हणायचा याचे मार्गदर्शन गुलाबभाई आत्तार हे करायचे. त्यांची सासुरवाडी पंढरपूरची होती. पुण्यात ते गाडीखान्याजवळ राहात होते. अशा या गुलाबभाईंचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मुस्लिम धर्माचे लोक व वारकरी लोकही अंत्ययात्रेच्या दर्शनाला जमलेले होते. अंत्ययात्रेची तयारी झाली. त्या वेळी कुराणाचे पठण करणाऱ्या मुस्लिम मौलवींना वारकरी लोकांनी विनंती केली, की गुलाबभाई हे नित्यनेमाने आमच्या वारीला येत. तेव्हा त्यांच्या घरापासून मंडईच्या गणपतीपर्यंत आम्ही वारकरी भजन म्हणणार आहोत. त्या वेळी गुलाबभाई यांच्या पत्नी, मुले, नातेवाईक व मुस्लिम मौलवी या सर्वानी ही विनंती मान्य केली व गुलाबभाई यांची अशी ही अभूतपूर्व अंत्ययात्रा सुरू झाली. अंत्ययात्रेच्या पुढे पखवाज व ७०-८० लोक टाळ वाजवत भजन म्हणत होते. मंडई गणपतीजवळ ही अंत्ययात्रा आल्यानंतर वारकऱ्यांनी भजन संपवले. तेथे गणपती व पांडुरंगाची आरती झाली व सर्वानी टाळ गणपतीच्या मंदिरात ठेवले व पुढे मौलवींचे कुराणाचे पठण करत अंत्ययात्रा सुरू झाली. मला तर वाटते, की हे सत्य केवळ पुण्यातच शक्य आहे. नंतर वारकरी संप्रदायाप्रमाणे त्यांचा चौदावा झाला, तसेच मुस्लिम धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे चाळिसावादेखील त्यांच्या घरी झाला. त्या वेळी त्यांच्या घरासमोर भजन व कीर्तनही झाले. यातून वैश्विक मानवतेचे दर्शन झाले. हे फक्त पुण्यामध्येच घडू शकते.
दुर्दैवाने १९६५ साली एका माथेफिरू व्यसनी माणसामुळे धार्मिक दंगल उद्भवली. मंडईमध्ये मेंदी, करगोटे, गुलाल, बुक्का विकणाऱ्या मुस्लिम धर्माच्या आत्तारांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्या वेळी मंडईतील सगळय़ा मंडळींनी एकत्र येऊन ही दंगल थांबवली आणि फक्त तीन दिवसांतच ही दुकाने पुन्हा जशीच्या तशी उभी करून दिली व धार्मिक ऐक्याचे अभूतपूर्व दर्शन साऱ्या महाराष्ट्राला घडवले.
अशा सांस्कृतिक व धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवणारे पुणे आजही बऱ्याच अंशी टिकून असले तरी अनेक बदल त्यामध्ये घडत आहेत. त्या वेळी तालमीतील पहिलवानांची चतु:शृंगीला माळ घेऊन जाण्यासाठी दौड व्हायची. आता याला खूप वेगळे स्वरूप आलेले आहे. पठ्ठे बापूरावांचा बराच काळ पुण्यामध्ये गेला. त्यांच्या अनेक लावण्या मी ऐकल्या आहेत. त्या वेळी प्रबोधन, जनजागृती यांची तर पुण्यामध्ये रेलचेल असायची. स्वातंत्र्यपूर्व चळवळीचे पुणे हे केंद्र होते. महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण व अनेक नामवंत स्वातंत्र्यसेनानी हे पुण्यातील येरवडय़ाच्या जेलमध्ये होते. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे १९३२ साली पुणे करार झाला. त्या वेळच्या २१ दिवसांच्या महात्मा गांधींच्या प्राणांतिक उपोषणाचा अत्यंत गोड शेवट येरवडा जेलमध्ये झाला. माजी खासदार पा. ना. ऊर्फ बापूसाहेब राजभोज हे पुण्यातील घोरपडे पेठेत राहात होते. १४ वर्षे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. ते स्वभावाने थोडेसे विक्षिप्त होते. मात्र काही काळ त्यांनी महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील दुवा म्हणून काम केले. ज्या सत्यशोधक चळवळीचा मी उल्लेख केला त्यातील जवळकरांचे लिखाण हे अत्यंत कडवट व कणखर होते. त्यांनी ‘लोकमान्य टिळक हे देशाचे दुश्मन’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिल्याचे या पुण्याने पाहिले आहे.
पुण्यातील डेक्कन कॉलेज हे एक ऐतिहासिक केंद्र असून या वास्तूमध्ये मोठा इतिहास दडलेला आहे. अनेक नामवंतांचे अभ्यास केंद्र असलेल्या या डेक्कन कॉलेजबद्दल जगातून विचारणा केली जाते. तरुण पिढीतील कित्येक लोकांना याबद्दल माहिती आहे किंवा नाही याची माझ्या मनात शंकाच आहे. सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाची पुण्यात रेलचेल असायची. गजानन वाटवे, दत्ता वाळवेकर, बबनराव नावडीकर, त्यांच्यापूर्वी सरस्वतीबाई राणे यांच्या भावगीतांच्या दर्दभऱ्या आठवणी आजही पुणेकरांच्या मनामध्ये रेंगाळत आहेत. त्या वेळी रात्री १०चे बंधन नसताना, रात्री दोन-दोन वाजेपर्यंत चाललेल्या अनेक सभा, लोकनाटय़े, शाहीर पोवाडय़ाचे कार्यक्रम मी माझ्या लहानपणी पाहिलेले आहेत.
 हळूहळू या सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींमध्ये बदल होत गेले. आता सांस्कृतिक कार्यक्रमांचे रूपही बदलले आहे. पुण्यातील लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. पुण्याचा शैक्षणिक विस्तार वाढलेला आहे. अनेक औद्योगिक कारखाने झाले आहेत. सायकलींची जागा आता अनेक दुचाकी व मोटारगाडय़ांनी घेतलेली आहे. त्यामुळे पुण्याच्या पर्यावरणातही बदल झालेला आहे. हे सर्व जीवघेणे बदल पाहून मन हळवे होते. हे बदल अपरिहार्य आहेत. ते स्वीकारले पाहिजेत. आता पुढच्या पिढीला हा माझा अनुभव सांगत असताना, जुन्या गोष्टींना उजाळा देत असताना नवीन पिढीच्या पुढे या सगळय़ा वाढलेल्या पुण्याचे दर्शन कसे होईल हे कुणास ठाऊक? त्याची कल्पना करता येत नाही. तरी मी पुणेकर आहे याचा मला नक्कीच आनंद आहे.