कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान या दोन्ही महत्त्वाच्या जंगलांमध्ये वन्य प्राण्यांची जा-ये व्हावी यासाठी राखून ठेवलेल्या महत्त्वपूर्ण भ्रमणमार्गावरच मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणारे वाघ, बिबटे यांच्यासह सांबर, भेकर, विविध पक्षी, सरपटणारे अनेक प्राणी यांच्या हालचालींवर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वन विभागाची चौकी आणि पोलीस पहारा हाकेच्या अंतरावर असतानाही पुण्यातील उद्योगपतीकडून ही तोड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
ही तोड रोखणे शक्य न झालेल्या वन विभागाने आता याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील उद्योगपती हुंबरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृक्षतोडीमुळे प्राण्यांच्या स्थलांतरामध्ये अडथळे येण्याची दाट शक्यता असल्याची कबुली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोयना आणि चांदोली ही दोन्ही महत्त्वाची वनक्षेत्रं सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येतात. या भागात वाघाचा वावर असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. या दोन्ही वनक्षेत्रांमधील प्राण्यांचे भ्रमण आणि स्थलांतर यासाठी खास भ्रमणमार्ग राखण्यात आला आहे. तो तब्बल पाच किलोमीटर लांबीचा आहे. त्या परिसरात कोयना जलाशय आणि काही वस्ती असल्याने प्राण्यांना जा-ये करण्यासाठी हा राखून ठेवलेला हा एकमेव मार्ग ठरतो. त्यामुळे या क्षेत्रात झाडांची तोड आणि व्यावसायिक बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. याच क्षेत्रात पुण्यातील उद्योगपती हुंबरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे चारशे एकर जमीन खरेदी केली आहे. हा भाग सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यात येतो. त्यापैकी केमसे घाटमाथा येथील सुमारे ५० एकरापेक्षा जास्त क्षेत्रावरील झाडांची तोड करण्यात आली आहे आणि तेथे जेसीबी वापरून रस्ता तयार करण्यात आला आहे. तोडलेल्या झाडांमध्ये हिरडा, बेहडा, जांभूळ, पिसा, ऐन, नरक्या, अंजन या प्रजातीच्या किमान काही हजार झाडांचा समावेश आहे. याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप वन्यजीव कार्यकर्ते रोहन भाटे यांनी केला आहे. त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने याबाबत गुन्हा दाखल केला.

भ्रमणमार्ग का महत्त्वाचा?
कोयना आणि चांदोली वनक्षेत्रांच्या दरम्यान वन्य प्राण्यांना जा-ये करता येईल, यासाठीचा हा एकमेव भ्रमणमार्ग आहे. सरकारनेच तो राखून ठेवला आहे. या मार्गाशिवाय इतरत्र जलाशय किंवा काही मनुष्यवस्ती आहे. त्यामुळे वन्य प्राणी भ्रमण व स्थलांतरासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यात येणाऱ्या क्षेत्रातच वृक्षतोड झाली आहे.

‘वन्यजीवांच्या भ्रमणावर परिणाम’
‘‘ही वृक्षतोड गेल्या १०-१२ दिवसांच्या काळात झाली आहे. या क्षेत्रातील झाडे तोडल्यामुळे वन्य जीवांच्या भ्रमणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या संदर्भात महाराष्ट्र वृक्षतोड नियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’
एन. आर. प्रवीण, साताऱ्याचे सहायक उपवनसंरक्षक