पुणेकर ११ लाख झाडे लावणार

एकाच दिवशी राज्यात दोन कोटी झाडे लावण्याच्या शासनाच्या कार्यक्रमासाठी सामाजिक व खासगी संस्था आणि कंपन्यांनीही उदंड नोंदणी केली आहे. वने व सामाजिक वनीकरण विभाग सोडून शासनाचे इतर विभाग, शाळा, संस्था आणि नागरिकांकडून शुक्रवारी अंदाजे ४ लाख झाडे लावली जातील असा अंदाज होता. परंतु आता जवळपास ११ लाखांहून अधिक झाडे लावण्यासाठी नोंदणी झाली आहे.

पुणे जिल्ह्य़ात १ जुलै रोजी १६ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. यात जवळपास १२ लाख झाडे वने व सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात येणार असून उर्वरित झाडे शासनाचे इतर विभाग आणि विविध संस्था व संघटनांकडून लावली जातील, असे ठरवण्यात आले होते. परंतु २५ जूनपर्यंतच ९ लाख १० हजार झाडे लावण्यासाठी पुणेकरांनी ‘ऑनलाईन’ नोंदणी केली होती. त्यानंतरही झाडे लावण्यासाठी विचारणा सुरूच राहिली आणि गुरुवारीही नोंदणी सुरू होती. आणखी दोन लाखांहून अधिक झाडांसाठी ‘ऑफलाईन’ नोंदणी करण्यात आली.

पुणेकर अंदाजे ४,५०० ठिकाणी वृक्षलागवड करणार असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विवेक कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘झाडे लावण्यासाठी नोंदणी करताना ती कुठे लावणार, खड्डे किती खणले, वृक्षारोपण कार्यक्रमाच्या नियोजनाचे काम कोण पाहणार, अशी माहिती घेण्यात आली होती. काही मोठय़ा कंपन्यांनी बाहेरुन झाडे विकत घेतली आहेत, तर काही संस्थांनी रोपे स्वत: तयार केली आहेत. बरेच विभाग आणि संस्थांनी सामाजिक वनीकरण विभागाकडूनही रोपे घेतली. लावल्या जाणाऱ्या झाडांपैकी ९० टक्के देशी वृक्ष असतील. वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, आंबा अशी विविध देशी झाडे लावली जाणार आहेत.’’

‘वने व सामाजिक वनीकरण’तर्फे वारजे टेकडीवर शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह या वेळी संगीतकार सलील कुलकर्णी व अभिनेता जॅकी श्रॉफ हेही उपस्थित राहणार आहेत.