महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात येत असलेल्या हातगाडय़ा तसेच जप्त केलेले अन्य साहित्य पळवून नेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सुरक्षारक्षकांना दमदाटी तसेच मारहाण करून हातगाडय़ा पळवून नेल्या जात आहेत. त्यामुळे अतिक्रमण कारवाईबरोबरच आता जप्त करून आणलेल्या गाडय़ा व माल सांभाळण्यासाठी महापालिकेला नवी व्यवस्था तयार करावी लागणार आहे.
महापालिकेच्या मे महिन्याच्या मुख्य सभेत अतिक्रमणांवर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून शहरात अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. सुरुवातीचे पंधरा दिवस जशी कारवाई सुरू होती तशा पद्धतीची कारवाई सध्या सुरू नसली, तरी अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. या कारवाईत विविध ठिकाणी रहदारीला अडथळे करून व्यवसाय करणाऱ्या हातगाडय़ा मोठय़ा संख्येत जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणचे बेकायदेशीर स्टॉलही जप्त करण्यात आले असून दुकानदारांनी दुकानांच्या बाहेरील जागेत अतिक्रमण करून टाकलेले लाकडी व लोखंडी स्टँड, शेड वगैरे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. अनेक व्यावसायिकांचा मालही जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या हातगाडय़ा, स्टॉलची संख्या मोठी असल्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गाडय़ा व स्टॉल ठेवण्यात आले आहेत. त्या बरोबरच महापालिकेच्या ताब्यातील काही मोकळ्या जागांवरही गाडय़ा व स्टॉल ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात या गाडय़ा पळवण्याचे प्रकार झाले असून अशा दोन प्रकारांबाबत महापालिकेने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे. जप्त करून आणलेल्या हातगाडय़ा पळवण्याचा प्रकार सुरुवातीला कोंढवा येथे घडला. त्यानंतर काही दिवसांनी विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेल्या हातगाडय़ा पळवून नेण्यात आल्या. त्या ठिकाणी रात्री काही जण रिक्षातून आले आणि सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करून हातगाडय़ा पळवून नेण्यात आल्या. अशाच पद्धतीने इतर काही ठिकाणचा माल व किरकोळ साहित्यही पळवून नेण्यात आले आहे. या प्रकारांमुळे महापालिकेला आता जप्त करून आणलेल्या मालाच्या सुरक्षिततेबद्दल नवी व्यवस्था तयार करावी लागणार आहे. जप्त केलेले स्टॉल वा हातगाडय़ा तसेच साहित्य संबंधितांना परत केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी हे साहित्य ठेवण्यात आले आहे तेथील सर्व जबाबदारी महापालिकेवरच आली असून जप्त करून आणलेले साहित्य योग्य प्रकारे ठेवून त्या ठिकाणी अनारोग्याची परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी घेण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागानेही अतिक्रमण विभागाला पत्रे दिली आहेत.