पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित नियमावलीबाबत पाच हजार चारशे पुणेकरांनी हरकती नोंदवल्या असून त्यावरील सुनावणी महापालिकेत सुरू झाली आहे. दोन दिवसांत चारशे हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन मार्ग प्रस्तावित आहेत. मेट्रोच्या प्रस्तावित मार्गापासून दोन्ही बाजूंना पाचशे मीटर अंतरापर्यंत मेट्रो प्रभावित क्षेत्रामध्ये ज्या मिळकती आहेत त्यांचे विकसन या पुढील काळात कशा पद्धतीने करावे, यासंबंधीचे नवे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे नियम महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत (डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स- डीसी रुल्स) प्रस्तावित करण्याची कार्यवाही केली जाणार असून त्यासाठी नागरिकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार पाच हजार चारशे नागरिकांनी मेट्रोच्या प्रस्तावित नियमावलीला हरकती घेतल्या आहेत.
या हरकती ज्या नागरिकांनी वा संस्था, संघटनांनी नोंदवल्या आहेत त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. सुनावणीची ही प्रक्रिया महापालिकेत सुरू असून दोन दिवसांत चारशे हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली. महापालिकेत सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ही सुनावणी घेतली जात आहे. ही सुनावणी शनिवारी (१८ ऑक्टोबर) घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.