ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची महाश्वेता देवी यांना आदरांजली

लेखकाचे वेगळे विश्व असते किंवा मी लेखिका आहे, म्हणजे वेगळी आहे, असे महाश्वेता देवी कधीही भासवत नसत. गर्दीमध्ये लपलेला प्रत्येक चेहरा हा त्यांच्यासाठी मोठा साहित्यिक होता. स्त्रीवादी किंवा साम्यवादी असा शिक्का त्यांनी मिरवला नाही, तर स्वत:च्या कामानेच त्या स्त्रीवादी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. कोणत्याही व्यक्तीचे अवडंबर त्यांनी कधी माजवले नाही, अशा शब्दात ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी महाश्वेता देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

समाजातील ‘नाही रे’ वर्गाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां महाश्वेता देवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर व सुदर्शन कलामंचतर्फे आयोजित स्मरणसभेत ते बोलत होते. या वेळी डॉ. देवी यांनी पत्रकारांशी संवाद साधत समाजाच्या अराजकतेकडे होणाऱ्या प्रवासाविषयी भीती व्यक्त केली. उत्तरार्धात महाश्वेता देवी यांच्या कथेवर आधारित संदेश भंडारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘महादू’ चित्रपट दाखविण्यात आला.

डॉ. देवी म्हणाले, रवींद्रनाथ टागोरांविषयी बोलताना देखील महाश्वेता देवी संयमाने बोलत. व्यक्तिप्रेमात काही-बाही बोलत सुटणे असा त्यांचा स्वभाव नव्हता. घडलेल्या घटनेविषयी फक्त सत्य मांडत राहण्याचे काम त्या करीत राहिल्या. स्वत:ची मते किंवा त्या मतांना अवास्तव रूप न देता, घटनेचे चित्र उभे करणे याला त्यांच्या दृष्टीने प्राधान्य असे. या विचारातूनच त्यांनी कधीही सरकारला सल्ले दिले नाहीत. ‘आहे हे असे आहे, आता जे करता येईल ते करा,’ असेच त्या सुचवत असत. महाश्वेता देवी आपल्या कामातून भटके विमुक्त, आदिवासी अशा घटकांच्या आई झाल्या.’’

समाजामध्ये सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवण्यासाठी योगदान

देणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, अशी खंत व्यक्त करून डॉ. देवी म्हणाले, की नारायणभाई देसाई, डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांच्यानंतर आता महाश्वेता देवी यांचेही निधन झाले आहे. अशा व्यक्तींच्या अनुपस्थितीत समाजाचा प्रवास अराजकतेकडे नेणारा होत आहे. समाजाने आता संघर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी.