काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांना शनिवारी साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कदम यांचे निवासस्थान, भारती विद्यापीठ भवन आणि कात्रज-धनकवडी येथील भारती विद्यापीठ येथे आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिलखुलास पतंगराव यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडतानाच त्यांनी अनेकांना केलेल्या मदतीचा उच्चार करण्यात आला. त्यानंतर हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव सोनसळ (वांगी, जि. सांगली) येथे नेण्यात आले.

कदम यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे शुक्रवारी रात्री निधन झाले होते. बीएमसीसी रस्त्यावरील ‘सिंहगड’ या निवासस्थानी सकाळी साडेसात वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी ध्यानात घेऊन नामदार गोखले रस्त्यापासून बीएमसीसीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी मंत्री मदन बाफना, आमदार प्रणिती शिंदे, निरंजन डावखरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश चिटणीस अभय छाजेड, महापालिका गटनेते अरिवद शिंदे, सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, बालरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री फिरोदिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी आमदार विनायक निम्हण, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शास्त्री रस्त्यावरील भारती विद्यापीठ भवन आणि कात्रज येथील भारती विद्यापीठ येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव आणि जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, संस्थेतील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. भारती विद्यापीठ येथून हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव सोनसळ या कदम यांच्या जन्मगावी नेण्यात आले.

श्रद्धांजली

  • प्रतिभा पाटील : पतंगराव म्हणजे हसतमुख व्यक्तिमत्त्व. स्वत: आनंदी असायचे आणि दुसऱ्यांनाही आनंदी करायचे. शिक्षण क्षेत्रात साम्राज्य उभे करताना त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेकांचे भले केले आहे. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे.
  • शरद पवार : सार्वजनिक जीवनात ५० वर्षे कार्यरत असलेल्या पतंगराव कदम यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे स्वप्न त्यांनी भारती विद्यापीठ या नावाने पूर्ण केले असून त्यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विधिमंडळात आपल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणारे कदम यांनी शासनामध्ये प्रभावशाली मंत्री म्हणून आपल्या कामांचा ठसा उमटवला होता.
  • गिरीश बापट : घराण्याचा कोणताही वारसा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पतंगराव यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे उभे करण्याचे काम केले. सभागृहात तत्त्वनिष्ठा न सोडता ते विषय आग्रहाने मांडत असत. दिलखुलास स्वभावामुळे त्यांची सर्वाशी मैत्री होती.
  • अनिल शिरोळे : डॉ. पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका जाणकार आणि अभ्यासू, कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते मोठे झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रात ते यशस्वी झाले.
  • सुरेश कलमाडी : सांगली आणि पुण्याच्या विकासामध्ये भरीव योगदान देणारे पतंगराव माझे चांगले मित्र होते. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र दूरदृष्टीच्या आणि खंबीर नेतृत्वाला मुकला.
  • वंदना चव्हाण : प्रतिकूलतेवर मात करून कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे केले. त्यामागे त्यांची कामावरील अविचल निष्ठा दिसून येते. अत्यंत मनमिळावू असलेले पतंगराव सर्वाशी प्रेमाने वागायचे.