नाटय़ क्षेत्रातील मान्यवरांची भावना

नावाप्रमाणेच सुलभ आणि नैसर्गिक अभिनय हे सुलभा देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. बालरंगभूमी टिकली पाहिजे आणि प्रायोगिक रंगभूमीला हक्काची जागा मिळवून देणे हीच सुलभाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करीत नाटय़ क्षेत्रातील मान्यवरांनी सुलभा देशपांडे यांना गुरुवारी श्रद्धांजली अर्पण केली.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखा आणि सुदर्शन रंगमंच यांच्यातर्फे सुलभा देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, सुषमा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, अनंत कान्हो, नाटककार श्रीनिवास भणगे आणि ज्येष्ठ नाटय़समीक्षक माधव वझे यांनी सुलभाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. सुलभाताईंच्या अभिनयाच्या काही दृश्यफिती या प्रसंगी पडद्यावर दाखविण्यात आल्या. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.

माझी ५० वर्षांची जवळची मैत्रीण, अशी ओळख करून देत लालन सारंग म्हणाल्या, खरं तर ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील ‘चंपा’ ही भूमिका सुलभाला करायची होती. त्यासाठी ती तेंडुलकरांशी बोलली होती. मात्र, ही इच्छा तिने हे नाटक हिंदूीमध्ये करून पूर्ण केली. पूर्वी मुंबईला वास्तव्य होते, तेव्हा आमचे वारंवार एकमेकांच्या घरी जाणे होत असे. मुलांमध्ये रमण्याचा आनंद तिने शेवटपर्यंत लुटला. तिच्या जाण्यामुळे एक रिकामपणं आलं आहे.

स्नेहार्द डोळ्यांतून सुलभाताई रंगमंच आणि चित्रपटांतून व्यक्त व्हायच्या, असे श्रीनिवास भणगे यांनी सांगितले. ‘शांतता’ नाटकामधील बेणारेबाई ही भूमिका पाहून आम्हा त्या वेळच्या युवा कलाकारांना रंगभूमीची दिशा सापडण्यास मदत झाली. अभिनयात सहजता आणि भूमिकांमध्ये विविधता असे अनंत कान्हो यांनी सांगितले. बारामतीला ‘शांतता..’ हे नाटक पाहून मला नाटकाचे वेड लागले. सुलभाताई ही माणूस म्हणूनही गोड होती. आविष्कार संस्था तिच्यासाठी सर्वस्व होती, असे सुषमा देशपांडे यांनी सांगितले.

‘चूप कोर्ट चालू हैं।’ हे हिंदूी नाटक आणि ‘शांतता कोर्ट सुरू आहे’ हे मराठी नाटक अशा माझ्या नाटय़-चित्रपटाच्या पदार्पणामध्येच सुलभा या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले, असे सांगून अमोल पालेकर म्हणाले, दर्शनी रंगमंचापेक्षा वेगळे अवकाश शोधू शकतो का, या धडपडीला छबिलदास रंगमंचाने घर दिले. या चळवळीमध्येही सुलभा होती. ‘रामनगरी’ या हिंदूी चित्रपटामध्ये मी आणि माझ्या आईच्या भूमिकेमध्ये असलेली सुलभा असे आमच्यावर एक भजन चित्रीत झाले होते. या गाण्यासाठी हरिहरन या नव्या गायकाला संधी दिली होती. त्याचे चित्रीकरण पाहून संगीतकार जयदेव यांनी आमच्या अभिनयाला दाद दिली होती. अर्थात त्याचे मोठे श्रेय सुलभाचेच होते.

स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीवरील आंतरिक सौंदर्यवती अभिनेत्री असलेल्या सुलभाने ऋजू स्वभावाने सर्वाना जिंकले. चतुरस्र भूमिका करणारी सुलभा वैयक्तिक जीवनामध्ये निरागस होती, असे माधव वझे यांनी सांगितले.