जगातील सर्वोच्च दहाव्या असलेल्या अन्नपूर्णा शिखरावर पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या भूषण हर्षे, डॉ. सुमीत मांदळे आणि जितेंद्र गवारे या गिर्यारोहकांनी शुक्रवारी तिरंगा फडकवला. या यशाबरोबरच गिरिप्रेमी संस्थेने जगातील आठ हजार मीटरवरील आठवे हिमशिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ‘गिरिप्रेमी’ ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था ठरली आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.

नेपाळमध्ये वसलेले अन्नपूर्णा हे ८०९१ मीटर उंच असून ते जगातील दहावे सर्वोच्च शिखर आहे. गंडकी आणि माश्र्यंगदी या हिमनद्यांनी वेढलेल्या या शिखरावरील चढाई अत्यंत अवघड  मानली जाते. सततचे होणारे हिमप्रपात, अतिशय तीव्र धारेवरचा चढाई मार्ग यामुळे हे शिखर सर करण्यात आजवर जगभरातून केवळ अडीचशे गिर्यारोहकांनाच यश प्राप्त झाले आहे. यामुळेच गिरिप्रेमीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गिरिप्रेमीने गेल्या महिन्यात या मोहिमेस सुरुवात केली होती. या काळात येथील हवामानाशी जुळवून घेत, वेगवेगळ्या टप्प्यांवर चढाई करत गिरिप्रेमीचा संघ बुधवारी शिखराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. गुरुवारी रात्रीच शेर्पांच्या मदतीने गिरिप्रेमीच्या या संघाने अंतिम चढाई सुरू केली. मात्र या चढाई दरम्यान तीव्र स्वरुपाचा हिमवर्षाव आणि अती वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी अडथळे निर्माण केले. गुरुवारी रात्री सुरू झालेली ही मोहीम या अडथळ्यांना तोंड देत शुक्रवारी सकाळी मार्गस्थ झाली आणि दुपारी बाराच्या सुमारास गिरिप्रेमीच्या तीनही गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा शिखराच्या माथ्यावर पाऊल ठेवले.

आठ हजार मीटर उंचीवरील हिमशिखरे ही मानवी चढाईसाठी धोकादायक मानली जातात. जगात अशी चौदा शिखरे असून यातील एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, च्यो ओयू, धौलागिरी, मनास्लू आणि कांचेनजुंगा या सात अष्टहजारी शिखरमाथ्यास गिरिप्रेमीने यापूर्वीच स्पर्श केला आहे. या वर्षी अन्नपूर्णा शिखर सर करत संस्थेने या मालिकेतील आठवे शिखर सर केले. अशी कामगिरी करणारी ‘गिरिप्रेमी’ ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था ठरली आहे.

जगातील दहावे सर्वोच्च शिखर

नेपाळमध्ये वसलेले अन्नपूर्णा हे ८०९१ मीटर उंच असून ते जगातील दहावे सर्वोच्च शिखर आहे. नेपाळ हिमालयाचा भाग असलेल्या या पर्वतरांगेत अनेक अतिउंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत समूह त्यात विशेष प्रसिद्ध आहे. यामध्ये १६ शिखरे ही ६ हजार मीटरपेक्षा तर १३ शिखरे ही ७ हजार मीटरपेक्षा उंच आहेत. तर या समुहातील ‘अन्नपूर्णा-१’ हे एकमेव शिखर आठ हजार मीटरपेक्षा उंचीचे आहे. मॉरिस हेर्झोग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहकांनी १९५० साली सर्वप्रथम या शिखराला गवसणी घातली होती. त्यानंतर आजवर केवळ अडीचशे गिर्यांरोहकांनाच हे यश प्राप्त झालेले आहे.

गिरिप्रेमी संस्थेतर्फे २०२० मध्येच या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र जगभर अवतरलेल्या करोना महामारीमुळे त्या वेळी ही मोहीम स्थगित करावी लागली होती. पुढे या करोनाच्या दहशतीतही शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखत, आर्थिक आघाडीवर संघर्ष करत मराठी गिर्यारोहकांनी मिळवलेले हे यश लक्षणीय आहे.

– उमेश झिरपे, अन्नपूर्णा मोहिमेचा नेता