डेंग्यू तापाचा उपद्रव शहरात अजूनही ओसरायचे नाव घेत नसल्यामुळे या तापाच्या उपचारांदरम्यान दिल्या जाणाऱ्या ‘प्लेटलेट्स’ या रक्तघटकाच्या मागणीत शहरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागणीतील वाढीमुळे शहरातील काही रुग्णालयांत प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.
डेंग्यूबरोबर कर्करोग आणि रक्ताशी संबंधित काही आजारांच्या रुग्णांनाही प्लेटलेट्स लागत असल्या तरी पावसाळा सुरू झाल्यानंतर या मागणीत वाढ होऊ लागल्याचे निरीक्षण केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर यांनी नोंदवले. डॉ. चाफेकर म्हणाले, ‘‘प्लेटलेट्सच्या मागणीत सध्या खूपच वाढ झालेली दिसत असून रोज वीस ते बावीस रुग्णांकडून प्लेटलेट्सची मागणी होते. रुग्णालयात नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ प्लेटलेट पिशव्या जमा झाल्या होत्या. परंतु त्या दोनच दिवसांत संपल्यामुळे सध्या प्लेटलेट्स उपलब्ध नाहीत. सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरेही कमी होत असल्यामुळे नातेवाइकांना प्लेटलेट्स दान करण्याबद्दल विनंती करावी लागते. दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातही प्लेटलेट्सचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे.’’
प्लेटलेट्सचे ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ आणि ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ असे दोन प्रकार आहेत.रक्तदात्याच्या शरीरातून घेतलेल्या रक्तात प्लेटलेट्सचे प्रमाण खूप कमी असते. एका रक्तदात्याच्या प्लेटलेट्स एका रुग्णासाठी पुरेशा पडत नसल्यामुळे एकाहून अधिक रक्तदात्यांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स एकत्र केल्या जातात. याला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ म्हणतात.
सिंगल डोनर प्रकारात दात्याच्या रक्तातील केवळ प्लेटलेट्स  ‘एफेरेसिस मशिन’ या यंत्राद्वारे काढून घेतले जातात आणि इतर रक्तघटक दात्याच्या शरीरात परत सोडले जातात. सिंगल डोनर प्लेटलेटस्चे ‘कॉन्सेंट्रेशन’ रँडम डोनर प्लेटलेटस्पेक्षा अधिक असते. या प्रकारच्या प्लेटलेटस्ची मागणी लक्षणीयरित्या वाढली असल्याचे जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘रँडम डोनर प्लेटलेट्सच्या मागणीत सुमारे २० ते २५ टक्क्य़ांची वाढ झाली असून सिंगल डोनर प्लेटलेट्सच्या मागणीत ४० ते ५० टक्क्य़ांची वाढ दिसत आहे. असे असले तरी सध्या प्लेटलेट्सचा तुटवडा नाही. दिवाळीनंतर ५ ते १० नोंव्हेबरदरम्यान प्लेटलेट्सच्या उपलब्धतेबद्दल अडचण निर्माण होऊ शकेल, परंतु त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
दर आठवडय़ाला घेतली जाणारी रक्तदान शिबिरे आणि नेहमीचे रक्तदाते यांच्यामुळे प्लेटलेटस् संपल्याची स्थिती नसल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. जयंत आगटे म्हणाले. सिंगल डोनर प्लेटलेट्सची एकूण मागणी वाढली असली तरी त्या खर्चिक असल्यामुळे काही रुग्ण रँडम डोनर प्लेटलेट्सचा आग्रह धरतात. सध्या दोन्ही प्रकारच्या प्लेटलेट्स पुरवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.