राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या गज या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, पुढील दिवसांत त्याची तीव्रता वाढणार आहे. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार गज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने या परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश असल्याने कोकण, मुंबई विभाग वगळता इतर ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्याने थंडी अवतरली आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली आला आहे. चक्रीवादळाच्या स्थितीत राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.