News Flash

तृप्ती देसाई करणार ‘ताईगिरी’ पथकाची स्थापना

'ताईगिरी' पथकामध्ये सहभागी असलेल्या महिला पूर्णपणे प्रशिक्षित असणार आहेत.

तृप्ती देसाई (संग्रहित छायाचित्र)

महिलांच्या हक्कांसाठी आक्रमक आंदोलने करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता महिलांच्या संरक्षणासाठी ताईगिरी पथकाची स्थापना करणार आहेत. येत्या नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गाष्टमीच्या दिवशी पुण्यात या पथकाची स्थापना केली जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने संपूर्ण राज्यभरात पथक सुरू केले जाईल, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली.
राज्यभरात महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी त्यांच्याजवळ नेहमी एखादी काठी बाळगली पाहिजे. स्वत:च्या वाहनांनी प्रवास करणाऱ्या महिलांनी ही काठी नेहमी स्वत:बरोबर बाळगली पाहिजे. जेणेकरून वेळ पडल्यास महिलांना स्वसंरक्षण करता येईल. हातातील काठी पाहूनच वाईट विचारांच्या लोकांची त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होणार नाही, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले.
‘ताईगिरी’ पथकामध्ये सहभागी असलेल्या महिला पूर्णपणे प्रशिक्षित असणार आहेत. सहा जणांच्या या पथकात दोन पुरुष सदस्यांचा समावेश असून दुचाकीवरून संबंधित परिसरात गस्त घालण्यात येणार आहे. उत्सवकाळात रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्यांच्या टोळक्‍यांवर ताईगिरी पथकाचे विशेष लक्ष असणार आहे. एखादी टोळी महिलेची छेड काढताना दिसल्यास त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम पथक करणार आहे. या वेळी घडलेल्या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी पथकाकडे तशी व्यवस्था असणार आहे. तसेच रात्रीच्या वेळीस तरुणींना कोणी छेडत असल्यास त्यांना तत्काळ ताईगिरी पथकाची मदत मिळावी, यासाठी पथकातील महिलांचे हेल्पलाईन नंबर सार्वजनिक स्थळांवर प्रदर्शित केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ताईगिरी पथकाची स्थापना होणार आहे. छेडछाडीच्या प्रकरणांना वेळीच आळा घातला नाही, तर यातूनच बलात्कारासारखे गंभीर प्रकार घडतात. त्यामुळे उत्सवकाळात महिलांच्या संरक्षणासाठी अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘ताईगिरी’सारख्या पथकांची गरज असल्याचेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 10:43 am

Web Title: trupti desai will form taigiri birgade to protect womens
Next Stories
1 ग्रामीण आरोग्यसेवेच्या विस्ताराचे उद्दिष्ट
2 मांजरआख्यान!
3 आयटी कंपन्यांवर खैरात; करदाते मात्र वाऱ्यावर
Just Now!
X