सत्ता शाश्वत नसून, संघटना शाश्वत असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये पक्षाच्या विस्तारावर भर देण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. शत-प्रतिशत भाजप या नाऱ्याचा उल्लेख करून त्यांनी पक्षवाढीकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. आपल्या या विधानाचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप रविवारी पुण्यामध्ये झाला. समारोपाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नितीन गडकरी आले होते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी पक्षाशी संबंधित विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारच्या कामाचे कौतुकही केले.
गडकरी म्हणाले, भाजप हा कोणत्याही एका नेत्याचा पक्ष नाही. देशात इतर काही पक्ष आहेत की जे एका परिवाराचेच आहेत. पण भाजप हा तसा पक्ष नाही. या पक्षाचे व्यक्तिमत्त्वच वेगळे आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पक्षाचे काम करताना जुन्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता म्हणून केलेल्या कामाचा आदर्श प्रत्येकाने आपल्यापुढे ठेवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रापुढे सध्या सर्वांत मोठी समस्या पाण्याची आहे. त्यामुळे राज्याला पुढे जायचे असेल, तर पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या पुढे नेणे, हे सर्वात मोठे काम आपल्यापुढे आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे कौतुकास्पद असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.