दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या वादग्रस्त भाषणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलमध्ये सुमारे तीन ते चार युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिथे उपस्थित असलेल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रोखले. संबंधित तरूण राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर जनवाडी पोलीस चौकीसमोर राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले.
बुधवारी सकाळच्या सुमारास सुमारे तीन ते चार युवक पुण्यातील विद्या प्रतिष्ठान संचालित बारामती हॉस्टेल येथे आले. या युवकांनी हॉस्टेलमध्ये असलेल्या शरद पवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी लगेचच या युवकांना रोखले व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. हे युवक दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. शरद पवार हे विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या भाषणात महादेव जानकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची तोडफोड केली होती. जानकर यांनी ज्या भाषेत टीका केली ती राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मंगळवारी केली. जानकर हे पुण्यात कधी येतात याची आम्ही वाट पहात आहोत. त्यांनी केलेल्या विधानांचा त्यांना पश्चात्ताप होईल, अशी अद्दल राष्ट्रवादी घडवेल, असाही इशारा काकडे यांनी दिला आहे.