चिन्मय पाटणकर

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर १९७० ते ८५ या दरम्यान गाजलेल्या दहा नाटकांचे निवडक सात प्रयोग रंगकर्मी प्रदीप वैद्य पुढील दीड वर्षांत करणार आहेत. बेइमान या नाटकापासून त्याची सुरुवात होईल.

मराठी व्यावसायिक रंगभूमी आशयानं नेहमीच संपन्न होती, त्याचवेळी प्रयोगशीलही होती. नव्या पिढीला या नाटकांची, नाटकांच्या प्रयोगशील आकृतिबंधाची आणि भाषाशैलीची ओळख करून देण्याचा प्रकल्प रंगकर्मी प्रदीप वैद्य यांनी हाती घेतला आहे. १९७० ते ८५ या दरम्यान गाजलेल्या दहा नाटकांचे निवडक सात प्रयोग रंगकर्मी प्रदीप वैद्य पुढील दीड वर्षांत करणार आहेत. ‘बेइमान’ या नाटकापासून त्याची सुरुवात होईल.

मराठी व्यावसायिक रंगभूमीसाठी अनेक नाटककारांनी नाटके लिहिली. त्यातही बरीच नाटके गाजली, त्यांना व्यावसायिक यश मिळाले. पुढे जागतिकीकरणाच्या रेटय़ात मराठी नाटकानंही कात टाकली. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरची सीमारेषा धूसर झाली. प्रायोगिक रंगभूमीवरची अनेक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरही सादर झाली. या सगळ्यात नवी पिढी आपल्या नाटय़परंपरेपासून काही प्रमाणात दूर गेली. नव्या काळाचं आणि स्वतचं नाटक करताना आपल्या परंपरेची नीट ओळखही झाली नाही. आजच्या काळात भाषा व्यामिश्र झालेली असताना भाषेची श्रीमंती असलेली नाटकं वाचलीही जात नाहीत. म्हणूनच रंगकर्मी प्रदीप वैद्य यांनी अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. निवडक कलाकारांच्या साहाय्यानं ही नाटकं रंगभूमीवर येतील. ही सर्व नाटकं प्रदीप वैद्यच दिग्दर्शित करणार आहेत.

‘नव्या पिढीचे कलाकार जुन्या पद्धतीच्या नाटय़संहिता, भाषाशैली, मांडणीविषयी अनभिज्ञ आहेत. वाचन कमी झालं आहेच; पण जुनी नाटकं करून पाहण्याची संधीही मिळत नाही. नाटय़ विद्यालयातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात ही संधी मिळते. नाटककार विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे कौतुक होत असताना चिं. त्र्यं. खानोलकर, अनिल बर्वे, वसंत कानेटकर यांच्यासारखे प्रतिभावंत नाटककार काहीसे मागे राहिले. १९७० ते ८५ या काळात माझ्यावर नाटकाचा संस्कार झाला. त्यामुळे त्याच काळात गाजलेली दहा नाटकं करून पाहण्याचा विचार आला. ‘काजव्यांचा गाव’ या नाटकाचा संच आणि एक्स्प्रेशन लॅबच्या माध्यमातून पुढील दीड वर्षांत दहा जुनी नाटकं करण्याची कल्पना पुढे आली. त्याची सुरुवात बेइमान नाटकापासून होईल. दीड महिना तालमी करून ही नाटकं रंगभूमीवर आणली जातील आणि त्याचे निवडक सातच प्रयोग होतील,’ असं प्रदीप वैद्य यांनी सांगितलं.

‘एकूण वीस नाटकांची यादी तयार केली आहे. त्यातली दहा नाटकं करायची आहेत. ही नाटकं करताना मूळ संहितेशी प्रामाणिक राहून सादरीकरणात नवे आयाम शोधण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे जुन्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी तो स्मरणरंजनात्मक अनुभव असेल, तर नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख होईल. या नाटकांचे सुरुवातीला पुण्यातच प्रयोग करण्याचे नियोजन आहे. नाटय़ अभ्यासाचा भाग म्हणून आणि आपल्या नाटय़ परंपरेच्या मुळाशी जाण्याचा हा प्रयत्न आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं.