क्षयरोगावर आठवडय़ात तीन वेळा औषध देण्याऐवजी दररोज औषध देण्याच्या ‘डेली रेजिमेन’ औषधपद्धतीला जुलैपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला महाराष्ट्रासह बिहार, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि केरळ अशा पाच राज्यांमध्ये ही औषधपद्धती वापरण्यात येणार आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

‘सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा’तील सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘क्षयरोगावर सध्या आठवडय़ात तीन दिवस औषधे दिली जात असली, तरी त्यात रुग्ण बरा झाल्यावर त्याला पुन्हा क्षयरोग होण्याचा धोका असू शकतो. प्रतिदिन औषधपद्धतीबाबतचा निर्णय फेब्रुवारीत घेण्यात आला असून नवीन पद्धतीतही आताचीच औषधे वापरली जाणार आहेत. परंतु त्यात रुग्णांच्या वजनानुसार २६ ते ३९ किलो, ४० ते ५५ किलो, ५६ ते ७० किलो आणि ७० किलोपेक्षा अधिक असे चार गट करण्यात आले असून वजनानुसार रुग्णाला औषधे दिली जातील. जुलैत या औषधपद्धतीसाठी औषधे उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पद्धत अमलात येण्यास २ ते ३ महिने लागू शकतील.’  क्षयरोगाच्या नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणारे ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ व ‘एक्स्ट्रीम मल्टी ड्रग रेझिस्टंट’ क्षयरुग्णांना ‘बिडाक्विलिन’ हे औषध देण्यासही १५ जूनपासून सुरुवात होईल. परंतु हा प्रकल्प मुंबईतील  रुग्णालयात राबवला जाणार आहे. क्षयरोगाच्या ‘सेकंड लाइन’ औषधांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचे निदान  सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.