खासगी डॉक्टरांकडून क्षयरुग्णांच्या सरकारकडे होणाऱ्या नोंदणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या संघटनेकडून नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात डॉक्टरांनी आयएमएकडे क्षयरुग्णांची नोंदणी करुन संघटनेमार्फत ही नोंदणी सरकारला पुरवण्याचा विचार सुरू आहे. चालू महिन्यापासून हा उपक्रम सुरू होणे अपेक्षित असून क्षयरुग्णांच्या होणाऱ्या नोंदणीत त्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
संघटनेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी ही माहिती दिली. मे २०१२ मधील शासन निर्णयानुसार क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती कळवणे डॉक्टरांना बंधनकारक करण्यात आले. क्षयरोगाचे निदान करणाऱ्या व त्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांनी विशिष्ट नमुन्यात ही माहिती कळवायची असून फिजिशियन, विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट या सर्वानी ते कळवणे अपेक्षित असते, परंतु खासगी डॉक्टरांकडून होणारी क्षयरुग्णांची नोंदणी कमी असल्याची नेहमीची तक्रार असल्याचे दिसून येते.
नव्या प्रकारे क्षयरुग्णांची नोंदणी करण्याच्या उपक्रमासाठी संघटनेकडून ५ राज्यांत प्रयत्न सुरू आहेत. ‘पुण्यात त्यासाठी पालिका हद्दीचे आयएमएतर्फे ७ विभाग करुन त्या विभागांमधील क्षयरोगाच्या रुग्णांच्या नोंदणीसाठी प्रत्येकी एक डॉक्टर नेमण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी विभागांचे समन्वयक त्यांच्याकडील क्षयरुग्णांची माहिती आयएमएला कळवतील. ही माहिती संघटनेच्या ‘आयएमए टीबी नोटिफिकेशन’ या राष्ट्रीय संकेतस्थळावर एकत्रितपणे प्रसिद्ध केली जाईल व सरकारच्या ‘नि:क्षय’ या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन दिली जाईल,’ असे ‘आयएमए- आरएनटीसीपी’ प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार डॉ. राम अरणकर यांनी सांगितले. ‘डॉक्टरांकडून क्षयरुग्णांची माहिती सरकारला पाठवण्यात सहकार्य मिळत नसल्याचे सरकारकडून सांगितले जाते. परंतु या उपक्रमातून आम्हीही माहिती पाठवत असल्याचे समोर येईल,’ असेही ते म्हणाले.