23 November 2017

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये ३ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण, गुन्हा दाखल

पिंपळे गुरव येथील धक्कादायक घटना

पिंपरी-चिंचवड | Updated: September 14, 2017 8:43 AM

पिंपळे गुरव येथे खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने देव कशप या तीन वर्षांच्या विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारहाण केली. (प्रातिनिधीक छायाचित्र)

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर याची गेल्या आठवड्यात हत्या झाली. या घटनेमुळे पालकांच्या मनात मुलांच्या शिक्षण संस्थेबद्दल धास्ती निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये एका शिक्षिकेने खेळ गटातील तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव कश्यप असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सांगवी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाग्यश्री पिल्ले असे या शिक्षिकेचे नाव आहे. बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे एका शिक्षिकेने देव कश्यप या तीन वर्षांच्या विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारहाण केली. यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. शिक्षिकेविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुलाची आई लक्ष्मी कश्यप आणि वडील सांगवी पोलिसांत गेले होते. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. शिक्षिकेनं लाकडी पट्टीने देवच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मारहाण केलेली सूज अद्याप उतरलेली नाही. मुलाची अवस्था पाहून कुटुंबीय घाबरले आहेत.

या प्रकरणी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

First Published on September 13, 2017 8:12 pm

Web Title: tuition teacher beaten 3 years student in pimpri chinchwad