राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आणि साहित्य बहुआयामी आहे. समाजाला मानवतेचा संदेश देणाऱ्या तुकडोजी महाराज यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी सोमवारी केली.   
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि राज्य सरकारतर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संमेलनाध्यक्ष या नात्याने पठाण बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, प्रकाश वाघ, बबनराव वानखेडे, जनार्दन बोधे आणि रघुनाथ वाडेकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. पठाण म्हणाले, तुकडोजी महाराजांनी भारतीय अस्मिता जतन करीत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ या त्यांच्या रचनेला नोबेल पुरस्कार मिळायला हवा. त्यांची ग्रामगीता हा ग्रामीण भारताचा ज्ञानकोशच आहे. कर्मकांडामध्ये अडकलेल्या सामान्य शेतक ऱ्याला त्यांनी खडबडू जागे केले. केवळ स्वत:चा संप्रदाय निर्माण करण्यामध्ये धन्यता न मानणारे तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. युवा पिढीने बिल गेट्स यासारख्या पाश्चात्त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षाही तुकडोजी महाराज यांना आदर्श मानावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास मंत्रालय निर्माण केले असून त्याचे मूळ हे ग्रामगीतेमध्ये आहे. अयोध्येमध्ये राममंदिर-बाबरी मशिदीचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे मानवतेचे मंदिर उभारले तरच तुकडोजी महाराजांचा विचार अमलात आणल्यासारखे होईल.
ग्रामविकास खाते आत्ता आले आहे. खरा ग्रामविकास आणि मानवविकास हा तुकडोजी महाराजांनीच केला असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. विज्ञानातील माणसं मोठी आणि अध्यात्मातील गौण असा विचार मधल्या काळात झाला. विज्ञानाने माणसाचे भौतिक आयुष्य समृद्ध केले यामध्ये शंकाच नाही. पण, माणसाच्या मनाचा अभ्यास करणाऱ्या संतांनी जीवन जगण्याचा मार्ग सुकर केला, असेही त्यांनी सांगितले. साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्र्यांना व्यासपीठावर नाही तर प्रेक्षकांमध्ये बसविले पाहिजे. नको एवढे महत्त्व मिळाल्यामुळे राजकारण्यांनाही उगाचच आपण मोठे झाल्यासारखे वाटते. मंत्र्यांना महत्त्व देण्याची ही नाळ सुरुवातीलाच ठेचली पाहिजे, असेही गिरीश बापट यांनी सांगितले.
राज्य सरकारने ग्रामगीता, नामदेवगाथा असे महत्त्वाचे संतसाहित्य प्रकाशित केले आहे. मात्र, सरकारला या साहित्याचे मार्केटिंग करण्याची परवानगी नसल्यामुळे हे साहित्य पडून आहे. सरकारने हे साहित्य लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे उल्हास पवार यांनी सांगितले.
प्रा. विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश वाघ यांनी स्वागतपर भाषणात संमेलनाची माहिती दिली.