पुण्यात हंगामानुसार आर्थिक उलाढाल कशाप्रकारे बदलते हे सध्याच्या सुट्टय़ांच्या हंगामात ठळकपणे पाहायला मिळत आहे. महाविद्यालये आणि वेगवेगळय़ा क्लासेसना सुट्टय़ा लागल्यामुळे हॉटेल, खाणावळी, वसतिगृहे आणि इतरही लहान-मोठय़ा व्यावसायिकांच्या उत्पन्नांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. एकीकडे असा विपरीत परिणाम झाला असला, तरी खासगी बसेस व वाहतूक उद्योगाची चलती आहे.
पुण्यात गेल्या काही वर्षांत शिक्षणक्षेत्र आणि आयटी क्षेत्रात वाढ झाल्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बाहेरगावाहून आलेल्या या मंडळींमध्ये प्रामुख्याने युवकांची संख्या अधिक आहे. त्यांच्यामुळे खाण्यासाठीची हॉटेल्स, लहान-मोठी उपाहारगृहे, खाणावळी यांचा व्यवसाय तेजीत असतो. विशेषत: महाविद्यालये, क्लासेसच्या आसपास तसेच, वसतिगृहे असलेल्या भागांमध्ये हा बदल मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. आता मात्र, सुट्टय़ांमध्ये ही मंडळी गावी गेल्यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागत आहे.
पुण्यात सध्या सदाशिव पेठेसह मध्य शहर, कर्वेनगर-कोथरूड, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही परगावहून शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यामुळे कॉट बेसिसवर राहणारे, खोल्या भाडय़ाने घेऊन राहणारे तसेच वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर खाणावळी, डबे करून देणारे आणि नाश्ता-चहासाठी असलेल्या गाडय़ा, टपऱ्यांची मोठी चलती असते. या सर्वाना सध्याच्या सुट्टय़ांच्या हंगामाची झळ पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
‘‘उन्हाळी सुट्टय़ांचा खाणावळींचे उत्पन्न तब्बल २० ते ३० टक्क्य़ांनी घटले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात विद्यार्थी घरी जातात त्यामुळे उत्पन्न कमी होते. या काळात पदार्थ कमी प्रमाणात करतो,’’ असे माणिकबागेतील श्री सद्गुरू स्नॅक्स खानावळीचे सुनील धाराशीवकर यांनी सांगितले.
महाविद्यालयांच्या आसपास असणाऱ्या लहान-मोठय़ा दुकानांची उलाढाल सुमारे ५० ते ६० टक्के विक्री कमी झाली आहे. एप्रिल ते जून या काळात हे पाहायला मिळते. याबाबत गरवारे महाविद्यालयासमोर असलेल्या तापडीया ब्रदर्सच्या संकेत तापडीया यांनी सांगितले, ‘‘गिऱ्हाईक कमी असल्याने विक्री कमी होते, त्यामुळे मालही कमीच ठेवतो.’’ बिपीन स्नॅक्स सेंटरच्या मधुसूदन लोहोकर यांनी सांगितले, ‘मार्च संपत आला की गिऱ्हाईक कमी होते. जूनपर्यंत असेच असते. कॉलेज सुरू झाल्यावर लगेच गर्दी होत नाही.’
याउलट बस, रेल्वेस्थानकावर झुंबड उडालेली आहे. बस आणि रेल्वेला होणाऱ्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्सला मोठी मागणी आहे. जळगाव, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड अशा एकाच मार्गावर जाणाऱ्या खासगी बसेसच्या कंपन्यांची संख्या १५च्या वर आहे. राज्य रस्ते परिवहन महामंडळांच्या बसेसशिवाय खासगी बसेसची उलाढाल कमालीची वाढली आहे. खासगी बस कंपन्यांची दिवसाची उलाढाल १५ ते १६ लाखांवर गेली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक, पौड रस्ता, जंगली महाराज रस्ता, संगमवाडी, तसेच, उपगनरांमध्ये काळेवाडी, सांगवी, निगडी, काळेवाडी येथे त्यांची गर्दी वाढलेली दिसत आहे.
या बसेससाठी बुकिंग घेणारे राजेश राठोड यांनी सांगितले, ‘‘मे आणि जून महिन्यात आम्हाला जेवायलाही वेळ मिळत नाही. एका मार्गावर जाणाऱ्या किमान १० ते १५ कंपन्यांच्या बसेस आहेत. विशेषत: शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी गाडीला मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. फक्त शिवाजीनगर भागात ट्रॅव्हल्सची ३० ते ३५ बुकिंग करून घेणारी टेबल लागतात. शिवाजीनगर भागात रोजची आर्थिक उलाढाल १५ ते १६ लाख आहे.’’