बारावीची परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध

पुणे : राज्य शासनाने राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळातर्फे  लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.

करोना महासाथीच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक आरोग्याला प्राधान्य आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. सीबीएसई, आयसीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य मंडळाचीही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सर्व संबंधित घटकांशी चर्चा के ल्यानंतर सध्याची परिस्थिती परीक्षेसाठी पोषक नसल्याने पर्यायी मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा पर्याय राज्याने केंद्राला सुचवले होते, असेही गायकवाड यांनी सांगितले.

क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी मुदतवाढ

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे क्रीडा गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फ त जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करण्यास १२ जून ते २१ जून, संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव आणि यादी सादर करण्यास १५ जून ते २५ जूनची मुदत देण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवी आणि नववीमध्ये असतानाच्या, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीमध्ये असतानाच्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.