राज्यातील बारावीची परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप राज्य शासन आणि राज्य मंडळाने निर्णय घेतलेला नसल्याने बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मानसिक ताणात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा द्यायची असल्याने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास आणि त्याच वेळी प्रवेश परीक्षा असल्यास काय करायचे असाही त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत बारावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही आवश्यक असतात. त्यामुळे बारावीची परीक्षाही महत्त्वाची आहे. बारावीची परीक्षा आणि त्याचवेळी प्रवेश परीक्षाही आल्यास काय करायचे असा प्रश्न असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता आहे.

‘राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत. राज्य शासनाने मे महिन्यात बारावीची परीक्षा घेतल्यास प्रवेश परीक्षेच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होणार आहे. माझी विधीची प्रवेश परीक्षा १३ जूनला आहे. ही प्रवेश परीक्षा पुढे जाणार की नाही या बाबत अद्याप स्पष्टता नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही दीड वर्षं लेखी परीक्षाच दिलेली नाही. त्यामुळे बारावीची परीक्षा व प्रवेश परीक्षेचा मानसिक ताण प्रचंड आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी समजून घ्यावेत. बारावीची परीक्षा सरसकट रद्द न करता ज्यांना परीक्षा द्यायची आहे, ज्यांना बारावीचे गुण महत्त्वाचे वाटतात त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय द्यावा. बाकी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर उत्तीर्ण करावे. मात्र बारावीच्या परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा,’ असे बारावीचा विद्यार्थी मल्हार सातव म्हणाला.

‘परीक्षा होणार की नाही, परीक्षा होणार असल्यास ती कधी होणार हा प्रश्न आहे. मात्र सध्याच्या अनिश्चिततेमुळे मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि बारावीची नियमित परीक्षा याचा ताण मुलांवर आणि पर्यायाने पालकांवरही आहे. परीक्षा जितकी उशिरा होईल, त्याचा पुढील शैक्षणिक प्रवेशावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शासन परीक्षेबाबत काय नियोजन करत आहे, या बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा तरी मिळेल, असे मिलिंद आंबटकर या पालकांनी सांगितले.