महाविद्यालयातील शेवटचे वर्ष असल्याने दोघींनी मुरुड येथे सहलीसाठी जाण्याचा हट्ट धरला होता.. यापूर्वी त्या कधीच महाविद्यालयाच्या सहलीला गेल्या नव्हत्या.. शेवटचे वर्ष असल्याने आम्ही राफिया आणि साफियाला सहलीला जाण्याची परवानगी दिली.. पण अखेर काळानेच त्यांच्यावर घाला घातला.. आमच्या स्वनांचा चुराडा झाला..
मुरुड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राफिया आणि साफिया या जुळ्या बहिणींचे वडील मुनीर अन्सारी यांनी मंगळवारी ही भावना व्यक्त केली. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात राहणाऱ्या अन्सारी भगिनींचे पार्थिव मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी आणण्यात आले. तेव्हा अन्सारी कुटुंबीयांना शोक अनावर झाला. तोफखाना परिसरावरही शोककळा पसरली. कसबा पेठेतील दफनभूमीत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोघींच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.
राफिया आणि साफिया या दोघी लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोघींनी आझम कॅम्पस येथे घेतले. दोघी संगणकशास्त्र शाखेत शेवटच्या वर्षांत शिकत होत्या. उत्तीर्ण झाल्यानंतर दोघींनी माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शेवटचे वर्ष असल्याने या दोघींनी सहलीला जाण्याचा हट्ट धरला होता. आम्ही त्यांना परवानगी दिली. मात्र, काळाने या दोघींना आमच्यापासून हिरावून नेले, अशा शब्दांत त्यांचे वडील मुनीर यांनी भावनांना वाट करून दिली.
दरम्यान, कोंढव्यात राहणारे विद्यार्थी सुमैय्या अन्सारी, शिफा काझी, साजिद चौधरी, इफ्तेकार शेख, फरिन सय्यद, मोहम्मद अन्सारी यांचे पार्थिव पहाटे कोंढव्यात आणण्यात आले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर कोंढव्यातील दफनभूमीत दफनविधी करण्यात आला. त्यावेळी कोंढव्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच आझम कॅम्पस परिसरातील आणि लष्कर भागातील व्यावसायिकांनीही त्यांची दुकाने व व्यवहार मंगळवारी बंद ठेवले. सना शेख (रा. हडपसर), समीरन शेख (रा. पुण्याईनगर, धनकवडी) यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. स्वप्नाली सलगर (रा. तरवडे वस्ती, मोहमदवाडी), सुप्रिया पान (रा. फातिमानगर) यांचे पार्थिवही पहाटे त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
आझम कॅम्पस सुन्न
शोकाकूल वातावरणात विद्यार्थ्यांचा दफनविधी
मुरुड येथील अपघाताच्या पाश्र्वभूमीवर आझम कॅम्पस मंगळवारीही सुन्न होते. शोकाकूल वातावरणात विद्यार्थ्यांच्या मृतदेहावर अंतिम विधी करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही गर्दी केली होती. महाविद्यालयाने बुधवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.
मुरुड येथील अपघाताच्या धक्क्य़ातून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे आझम कॅम्पस मंगळवारीही सावरले नाही. महाविद्यालय मंगळवारी बंदच राहिले. जमलेल्या विद्यार्थ्यांमध्येही अपघाताचीच चर्चा होती. सहलीवरून सुखरूप आलेले विद्यार्थीही सुन्नच आहेत. अपघातात दगावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृतदेहावर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंतिम विधी करण्यात आले. कोंढवा, हडपसर, शिवाजीनगर येथील दफनभूमीमध्ये सकाळी अंतिम विधी करण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आबेदा इनामदार महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, सामाजिक कार्यकर्ते या वेळी हजर होते.
महाविद्यालयाचे नियमित कामकाज आणि अध्यापनाचे काम बुधवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार आहे. महाविद्यालयाच्या मैदानात सकाळी साडेअकरा वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.