चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचे नियोजन
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात जलदगतीने चाचण्या होण्यासाठी तब्बल अडीच लाख प्रतिजन चाचणीसंच (अँटीजेन किट्स) खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्य़ात चाचण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. दरम्यान, देशाच्या तुलनेत २५ जूनपासून आतापर्यंत दैनंदिन चाचण्यांत पुणे अग्रणी आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून प्रत्येकी एक लाख आणि ग्रामीण भागासाठी ५० हजार प्रतिजन चाचणीसंच खरेदी करण्यात येणार आहेत. एक संच ४१० रुपये यानुसार खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे दैनंदिन करोना चाचण्यांचे प्रमाण आगामी काळात आणखी वाढवण्यात येणार आहे. सध्या दररोज दहा ते बारा हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यात येतात.
याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून यापूर्वी प्रत्येकी एक लाख प्रतिजन चाचणीसंच खरेदी करण्यात आले होते. त्यांचा वापर करण्यात आल्याने आणखी प्रत्येकी एक लाख चाचणीसंच खरेदी के ले जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागासाठी ५० हजार चाचणीसंच खरेदी करण्यात येत आहेत. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून प्रतिसंच ४५० रुपयांना खरेदी करण्यात आले होते. आता ४१० रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. शहरासह जिल्ह्य़ात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार असल्याने या चाचणीसंचाची गरज भासणार आहे.’
सर्वाधिक चाचण्या पुण्यात
२५ जूनपासून आतापर्यंत देशात सर्वाधिक दैनंदिन चाचण्या पुण्यात घेण्यात येत आहेत. परिणामी करोना रुग्णांची संख्या जास्त आढळून येत आहे. पुण्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ३८ हजार चाचण्या घेण्यात आल्या होत्या, तर जुलै महिन्याच्या अखेरीला ७५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. सध्या पुण्यात दररोज दहा ते बारा हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. आगामी काळात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार असल्याने प्रतिजन चाचणीसंच खरेदी केले जात आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 1:19 am