News Flash

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात अपघात ; दोन जवानांचा मृत्यू, नऊ जवान जखमी

या अपघाताबाबत लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत चौकशी सुरू आहे

पिंपरी : दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) प्रशिक्षणा दरम्यान गुरुवारी झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला, तर नऊ जवान जखमी झाले.

लान्स नाईक पी. के. संजीवन (वय २९, रा. सीएमई, मूळ रा. जिल्हा पलक्कड, केरळ) आणि नाईक बी. के. वाघमोडे (वय २८, रा. सीएमई, मूळ रा. दौंड, जिल्हा पुणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला. संजीवन आणि वाघमोडे यांना अपघातानंतर तातडीने खडकी येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मेजर सूर्यजित सिंह, सुभेदार पी. षण्मुखम, नायक बी. पी. गोरे, नायक शरद खोले, नायक डी. सी. शर्मा, देवेंद्रसिंह बिश्त, हवालदार परमजीत सिंह, नायक गुरपीत सिंह आणि नायक मनदीप सिंह हे जखमी झाले.

दापोडी येथील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षणाचा भाग म्हणून पूल बांधण्याचा सराव सुरू होता. सहा ते सात तुकडय़ा या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. हे बांधकाम सुरू असताना पूल बांधण्यासाठी लागणारे साहित्य तसेच बांधकामासाठी आधार म्हणून उभी केलेली व्यवस्था कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

अपघातात जखमी झालेल्या जवानांना खडकी येथील मिलिट्री हॉस्पिटल आणि कमांड हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

लष्करातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास पूल बांधण्याचे प्रशिक्षण सुरू असताना हा अपघात झाला. एकशे चार जवान या बांधकामात सहभागी होते. अपघातात लान्स हवालदार पी. के. संजीवन आणि नाईक बी. के. वाघमोडे यांचा मृत्यू झाला. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे म्हणाले, या अपघाताबाबत लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत चौकशी सुरू आहे. तपास पथकाने घटना स्थळाला भेट दिली आहे. अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 2:50 am

Web Title: two army jawans killed in accident at college of military engineering in pune zws 70
Next Stories
1 अखेर टीईटी अनुत्तीर्णाच्या सेवा समाप्तीचे आदेश
2 एल्गार प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी ‘एफबीआय’चे साहाय्य
3 अल्पावधीसाठीच ग्रहण दर्शन!
Just Now!
X