अनसरउल्लाह बांगला या संघटनेशी संबधीत तीन बांगलादेशी घुसखोर तरुणांना शनिवारी पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि.१९) पुन्हा मुंबई येथून पुणे एटीएसने आणखी दोन सदस्यांना अटक केली आहे.
एटीएसने शनिवारी तीन बांगलादेशी घुसखोर तरुणांना पाकिस्तानमधील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबधित असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असतानाच आज मुंबई येथून दोन तरुणांना याच संशयावरून ताब्यात घेतल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. ज्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे, त्यांचा पुण्यात पकडण्यात आलेल्या तिघांशी काही संबंध आहे का ? याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.

 

तत्पूर्वी, दि. १६ मार्च रोजी एटीएसला वानवडी आणि आकुर्डी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, दहशतवादी पथकाने वानवडी परिसरात नेमका शोध घेतल्यानंतर त्यांनी एका बांगलादेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान त्याने इतर दोघे आकुर्डी परिसरात राहत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत. या तिघांनी शहरात आलेल्या इतर एबीटी ग्रुपच्या सदस्यांना राहण्यास मदत केली आहे. या तिघांपैकी एक जण संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एका संस्थेजवळ नोकरी आणि राहण्यास होता.

एटीएसने ताब्यात घेतलेल्या तिन्ही बांगलादेशींची नावे कळू शकलेली नाहीत. मात्र, यांतील दोघे २५ वर्षीय तर एक जण ३१ वर्षीय तरुण आहे. तिघेही बांगलादेशातील विविध भागातील रहिवाशी आहेत.