पिंपरी चिंचवड परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक लंपास करणाऱ्या दोन बाईकचोरांना अटक करण्यात आली आहे. भोसरी एम. आय.डी.सी. पोलिसांनी ही कारवाई केली असून या दोघांकडून पोलिसांनी ४ लाख ७८ हजार किंमतीच्या १३ बाईक आणि ६ मोबाइल जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड भागात बाईक चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर तपास करताना पोलिसांना या दोघांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

अमोल रखमाजी खंडाळे (वय ३४) आणि राजेश उर्फ मुन्ना हरिचंद्र डोलारे (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अमोल खंडाळे हा पिंपळे सौदागरचा तर मुन्ना डोलारे हा आनंदनगर चिंचवड येथील रहिवासी आहे. रस्त्यावरच्या दुचाकी चोरून हे दोघेही ग्रामीण भागातील मजुरांना कमी किंमतीत या दुचाकी विकत असत अशी माहितीही समोर आली आहे. या दोघांवरचे ११ गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. या दोघांसोबतच सोनाजी लगाडे (वय ३१) यालाही अटक करण्यात आली आहे. सोनाजीकडून सोन्याची अंगठी, सोन्याची साखळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सूड उगवण्यासाठी चोरी केल्याचे सोनाजीने कबूल केले आहे.