News Flash

घरफोडय़ा करणाऱ्या सख्या भावांना अटक

चंद्रपाटले बंधू हे उदगीर लातूर मार्गे ट्रॅव्हल्सने पुण्यात येऊन घरफोडय़ा करीत. त्यानंतर पुन्हा ट्रॅव्हल्सने लातूरला परत जात होते. तर, कधी-कधी इतर साथीदारांना घेऊन घरफोडय़ा करीत.

| January 21, 2015 03:30 am

ते दोघे भाऊ.. लातूरहून खासगी बसने पुण्यात यायचे.. बंद सदनिका हेरून त्या फोडायच्या आणि परत पुन्हा ट्रॅव्हल्सने लातूरला पोहोचायचे.. बरीचशी रक्कम ऐशोआरामावर खर्च करायचे.. अन् आपले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून काही हिस्सा देवालाही वाहायचे.. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात केलेले २८ गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून पुण्याबरोबरच इतर ठिकाणचेही गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल उर्फ भैय्या विष्णुकांत चंद्रपाटले (वय २२) आणि सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले (वय २०, रा. वडवड, ता. चाकुर, लातूर) अशी अटक केलेल्या भावांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना मिळालेल्या माहितीवरून राहुल याला चाकण येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याचा लहान भाऊ सुदर्शन या्या मदतीने पिंपरी-चिंचवड भागात घरफोडय़ा केल्याचे सांगितले. त्यानुसार सुदर्शनला अटक करून दोघांकडे तपास केला असता त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात इतर साथीदारांच्या मदतीने एकूण २८ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून एकूण नऊ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. चंद्रपाटले बंधू हे उदगीर लातूर मार्गे ट्रॅव्हल्सने पुण्यात येऊन घरफोडय़ा करीत. त्यानंतर पुन्हा ट्रॅव्हल्सने लातूरला परत जात होते. तर, कधी-कधी इतर साथीदारांना घेऊन घरफोडय़ा करीत. या दोघांवर लातूर, नांदेड, सोलापूर जिल्हा, कुर्डूवाडी या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे आहेत.
 नोव्हेंबर महिन्यात  सांगवी येथे घरफोडी करताना राहूल याच्या साथीदाराला नागरिकांनी पकडले होते. मात्र, राहूल हा पळून गेला होता. तेव्हापासून त्याच्या मागावर युनिट चारचे पोलीस अधिकारी मागावर होते. त्याचा लातूर येथे तळ ठोकून होते. मात्र, त्याला पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने तो पळून पुण्याजवळील चाकण या ठिकाणी आला होता. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्य़ात दोन सख्या भावांसह आतार्पयंत नागनाथ सीताराम सुनपे (वय २१, रा. धानोरा, जि. नगर), लक्ष्मण उर्फ गुरू सोमनाथ कोरके (वय १९, रा. येणकी, उदगीर) आणि योगेश तुकामर गोणे (वय २१, रा. नाणेकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राहुल याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. घरफोडी केल्यानंतर मिळालेली रक्कम ऐशअाराम आणि नशेवर घालत होता. मात्र, काही ठरावीक रक्कम तो विविध देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन दान करीत असे. देवाला पैसे दान करीत असल्यामुळे आपण पकडले जाणार नाही, अशी त्याची भावना होती. मात्र, पोलिसांनी अखेर त्याचा माग काढील मुसक्या आवळल्या.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2015 3:30 am

Web Title: two burgler brothers arrested
Next Stories
1 महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या ५० प्रजाती धोक्यात!
2 बकोरिया यांच्याकडे पुन्हा पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद
3 डॉक्टरेट केलेल्या अमेरिकन विदुषीचे रंगले कीर्तन!
Just Now!
X